मैत्रेय ग्रुपच्या एजंटांनी गुंतवणूकदारांची माहिती व कागदपत्रे सादर करावीत; आर्थिक गुन्हे शाखेचे सार्वजनिक आवाहन; १० ऑक्टोबर रोजी जळगाव कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश

मैत्रेय ग्रुप प्रकरणाच्या पुढील तपासासाठी जळगाव जिल्ह्यातील संबंधित प्रतिनिधी व एजंटांनी गुंतवणूकदारांची माहिती आणि गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखेकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल मैत्रेय ग्रुप प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू; संबंधित एजंटांना तपासात सहकार्य करण्याचे आवाहन.

मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीविरुद्ध दाखल गुन्ह्याच्या पुढील तपासाच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील कंपनीशी संबंधित सर्व प्रतिनिधी व एजंट यांनी गुंतवणूकदारांची माहिती तसेच गुंतवणुकीशी संबंधित दस्तऐवजी पुरावे आर्थिक गुन्हे शाखेकडे सादर करावेत, असे सार्वजनिक आवाहन करण्यात आले आहे.

मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाणे, जळगाव येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १६५/२०२६ अन्वये भारतीय दंड संहितेतील कलम ४२०, ४०६, ३४ तसेच ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमातील कलम ३, ४, ५ आणि The Prize Chits and Money Circulation Schemes (Banning) Act, १९७८ मधील कलम ३, ४, ५, ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास जिल्हापेठ पोलीस ठाण्याकडून करण्यात आला असून, दोषारोपपत्र जळगाव येथील न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १७३(८) अन्वये अपर पोलीस महासंचालक, आर्थिक गुन्हे शाखा, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 एजंटांकडील कागदपत्रांची मागणी
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तथा प्रभारी पोलीस उपअधीक्षक नितीन पाटील यांच्याकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यातील मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीशी संबंधित प्रतिनिधी व एजंट यांच्याकडे गुंतवणूकदारांची माहिती, गुंतवणुकीसंदर्भातील कागदपत्रे, पावत्या, करारपत्रे, खातेवही, आर्थिक व्यवहारांची माहिती अथवा इतर कोणतेही संबंधित दस्तऐवजी पुरावे उपलब्ध असल्यास ते तपास पथकाकडे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित प्रतिनिधी व एजंट यांनी आवश्यक कागदपत्रे आणि माहितीसह १० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव कार्यालयात उपस्थित राहून तपास अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
तपासासाठी आवश्यक असलेली माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून देऊन पोलीस तपासात सहकार्य करावे, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!