डिजिटल दुनियेत एक चूक ठरू शकते महागात; विद्यार्थिनींना सायबर सुरक्षेचा मंत्र

लातूर येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेतील विद्यार्थिनींना फोटो मॉर्फिंग, एआय बनावट छायाचित्रे, सोशल मीडिया सुरक्षा, मजबूत पासवर्ड आणि सुरक्षित डिजिटल वापराबाबत सायबर सुरक्षा जनजागृती करण्यात आली.

डिजिटल दुनियेत एक चूक ठरू शकते महागात; विद्यार्थिनींना सायबर सुरक्षेचा मंत्र

जिल्हा परिषद कन्या प्रशालेतील विद्यार्थिनींना फोटो मॉर्फिंग, एआय बनावट छायाचित्रे आणि सुरक्षित सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शन

लातूर : डिजिटल जगात सुरक्षित आणि जबाबदारीने वावरण्याच्या उद्देशाने राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर आणि क्विक हील फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद कन्या प्रशाला, गव्हर्नमेंट कॉलनी, लातूर येथे विद्यार्थिनींसाठी सायबर सुरक्षा जनजागृती सत्र घेण्यात आले. यावेळी इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनींना डिजिटल सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सत्रामध्ये सायबर वॉरियर नरेश पंडित आणि सायबर वॉरियर अविष्कार कांबळे यांनी फोटो मॉर्फिंगद्वारे होणारी फसवणूक, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून तयार होणारी बनावट छायाचित्रे, मजबूत पासवर्ड तयार करण्याची पद्धत तसेच मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल करताना आवश्यक तेवढ्याच परवानग्या देण्याचे महत्त्व समजावून सांगितले.

यासोबतच सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, वैयक्तिक माहितीची गोपनीयता, संशयास्पद लिंक व संदेशांपासून सावध राहणे तसेच डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याबाबतही विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. दैनंदिन जीवनातील उदाहरणांच्या माध्यमातून माहिती देण्यात आल्याने विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न विचारले. त्यांच्या शंका व प्रश्नांचे निरसन करून सुरक्षित डिजिटल सवयींबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भगवान माळी यांचे मार्गदर्शन लाभले. उमाटे के. आर. यांनी विशेष सहकार्य केले. तसेच विद्यालयातील शिक्षकांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थिनींनी सुरक्षित डिजिटल वापराचा संकल्प करत सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचा संदेश आत्मसात केला. डिजिटल दुनियेत केलेली एक छोटीशी चूकही महागात पडू शकते, त्यामुळे सजग आणि जबाबदार डिजिटल वापर करणे आवश्यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!