शेडोळ येथील डिजिटल ग्रामसभेत सायबर पोवाडा व पथनाट्याद्वारे जनजागृती; सायबर फसवणूक झाल्यास १९३० हेल्पलाइनवर संपर्क करण्याचे आवाहन.
राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर आणि क्विक हील फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत शेडोळ येथे डिजिटल ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी गावातील नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांसमोर सायबर पोवाडा तसेच ‘डिजिटल ग्रामपंचायत’ या विषयावरील पथनाट्य सादर करून सायबर सुरक्षेबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली.
सायबर पोवाड्याच्या माध्यमातून डिजिटल युगातील विविध सायबर धोक्यांपासून सावध राहण्याचा संदेश देण्यात आला. तर ‘डिजिटल ग्रामपंचायत’ या पथनाट्यात ऑनलाइन फसवणूक कशा पद्धतीने केली जाते, अनोळखी लिंक आणि संशयास्पद संदेशांच्या माध्यमातून नागरिकांना कसे लक्ष्य केले जाऊ शकते, याचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.
विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना फसव्या लिंकची माहिती व्हावी आणि कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घ्यावी, हा महत्त्वपूर्ण संदेश पथनाट्यातून देण्यात आला.
यासोबतच फिशिंग, ओटीपी सुरक्षितता, मजबूत पासवर्ड, वैयक्तिक माहितीचे संरक्षण, सोशल मीडिया सुरक्षितता आणि सुरक्षित डिजिटल व्यवहार याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. सायबर फसवणूक झाल्यास विलंब न करता १९३० हेल्पलाइनवर संपर्क करण्याचे आवाहनही करण्यात आले.
या कार्यक्रमास निलंगा येथील पोलीस उपअधीक्षक श्री. विशाल ढुमे पाटील तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. दिलीपराव धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी महाविद्यालयाच्या शिक्षक प्रभारी सौ. जयश्री जटाळ आणि सौ. श्रद्धा पवार (जाधव) तसेच सायबर योद्धे श्रेयश माकणे, नरेश पंडित, प्राची भोसले आणि अविष्कार कांबळे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी गावकऱ्यांच्या मनातील सायबर सुरक्षेशी संबंधित प्रश्न आणि शंकांचे निरसन करून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले. गावकरी आणि विद्यार्थ्यांनी सायबर पोवाडा व पथनाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुरक्षित डिजिटल वापराबाबत जागरूक राहण्याचा संदेश घेतला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
