आपण मित्र गमावत चाललोय

सोशल मीडियावर मित्रांची संख्या वाढत असली, तरी प्रत्यक्ष आयुष्यातील जिव्हाळ्याची मैत्री आणि संवाद कमी होत असल्याची चिंता; मानसिक आरोग्यासाठी खरी मैत्री जपण्याचा संदेश.

आपण मित्र गमावत चाललोय का? बदलत्या जीवनशैलीतील मैत्रीचा ऱ्हास, वाढता सामाजिक एकाकीपणा आणि निरोगी मैत्रीचे मानसिक आरोग्यावरील परिणाम यांचा आढावा.

बदलत्या जीवनशैलीमुळे मानवी संबंधांवर होणारा गंभीर परिणाम एका सांख्यिकीय अभ्यासातून समोर आला आहे. तज्ज्ञांनी या परिस्थितीला ‘मैत्रीतील मंदी’ असे संबोधले असून, सोशल मीडियाच्या जगात माणसांचे जाळे विस्तारत असले, तरी प्रत्यक्ष आयुष्यात मात्र एका सामान्य व्यक्तीच्या वाट्याला केवळ ३ ते ४ खात्रीचे मित्र उरले असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

गेल्या साडेतीन दशकांत एकटेपणाचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. १९९० मध्ये एकही जवळचा मित्र नसलेल्यांची संख्या अवघी ३ टक्के होती, ती २०२६ मध्ये १२ ते १७ टक्क्यांवर पोहोचली आहे. याचा अर्थ आज प्रत्येक ८ ते १० व्यक्तींमध्ये एका व्यक्तीला हक्काचा मित्रच नाही. सर्वेक्षणातील नोंदीनुसार, प्रौढांनी गेल्या दशकभरात सरासरी ९ मित्र गमावले आहेत. यात ‘जेन झी’ म्हणजेच आजच्या तरुण पिढीमध्ये मित्र गमावण्याचा वेग (दर १० वर्षांत १०.४ मित्र) सर्वाधिक आहे. तसेच, १५ ते २४ वयोगटातील तरुणांचा मित्रांसोबत प्रत्यक्ष वेळ घालवण्याचे प्रमाण ७० टक्क्यांनी घटले आहे, जे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी चिंताजनक मानले जात आहे.

बदलत्या प्राधान्यक्रमांमुळे एकेकाळी अतूट असलेली नाती हळूहळू संपुष्टात येताना दिसते. सध्याच्या धावपळीच्या जीवनात करिअर, कुटुंब, मुले आणि जबाबदाऱ्या वाढल्यामुळे लोकांना स्वतःच्या वेळेचे नियोजन करणे कठीण होते, ज्यामुळे मित्रांना देण्यासाठी वेळ उरत नाही. जसजशी वय आणि परिस्थिती बदलते, तसतसे लोकांचे विचार, आवडी आणि ध्येये पण बदलतात. यामुळे जुने मित्र आपोआप मागे पडतात. अनेकदा मैत्रीत स्वार्थीपणा, अवास्तव अपेक्षा किंवा मानसिक ताण वाढतो, ज्यामुळे नाते टिकवणे कठीण होते. सातत्याने संवाद न ठेवल्यामुळे किंवा कठीण प्रसंगी साथ न मिळाल्यामुळे जिव्हाळ्याचे संबंध हळूहळू संपुष्टात येतात. आज सोशल मीडियावर मित्र जोडणे सोपे झाले आहे, परंतु प्रत्यक्ष भेट, संवाद आणि भावनिक जिव्हाळा कमी होऊन नाते फक्त ‘लाईक’पुरते मर्यादित राहिले आहे, हे सत्य नाकारता येत नाही.

बदलत्या जीवनशैलीमुळे भारतात एकटेपणाची समस्या गंभीर बनत चालली आहे. ३६ देशांमध्ये केलेल्या एका ताज्या आंतरराष्ट्रीय संशोधनानुसार, टर्की या देशानंतर भारत हा जगातील दुसरा ‘सर्वात एकटा देश’ बनला आहे.

या अहवालातील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, तब्बल ५८ टक्के भारतीयांनी आपल्याला वारंवार एकटेपणा जाणवत असल्याचे कबूल केले आहे. विशेष म्हणजे, पाश्चात्य देशांप्रमाणे भारतात लोक एकटे राहत नाहीत; इथे सरासरी कुटुंबात ४ पेक्षा जास्त सदस्य एकत्र राहतात. असे असूनही, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर संवादाची जागा ‘शून्यता’ घेत असल्याने लोक ‘गर्दीतही स्वतःला एकटे अनुभवत’ आहेत.

प्रत्यक्ष मित्रांशी किंवा कुटुंबीयांशी मन मोकळे करण्याऐवजी आजची तरुण पिढी सोशल मीडिया, एआय चॅटबॉट आणि ऑनलाइन साधनांवर अवलंबून राहत आहे. हा आभासी संवाद तात्पुरता दिलासा देत असला, तरी माणसांमधील भावनिक अंतर वाढवत असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनात मित्र का आवश्यक आहे?

मैत्री आणि मानसिक आरोग्य हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ मायकेल मर्फी यांच्या २०१८ मधील अभ्यासानुसार, एका मित्राने मारलेली आश्वासक मिठी देखील आपला तणाव आणि चिंता झटक्यात कमी करू शकते. घनिष्ठ मैत्री आपल्या भावनांना संतुलित ठेवते. जेव्हा आपल्याकडे हक्काचे मित्र असतात, तेव्हा सामाजिक भीती कमी होते, आत्मसन्मान वाढतो आणि नैराश्याची लक्षणे दूर राहतात. आपण आपल्या आयुष्यात माणसांना कसं प्राधान्य देतो, यावर आपला मानसिक ताण अवलंबून असतो. म्हणूनच, एक खरी मैत्री आपल्याला कोणत्याही चिंतेशिवाय, मनापासून आणि भरभरून जगायला शिकवते.

एक उत्तम आणि निरोगी मैत्री तुमचे मानसिक आरोग्य बदलू शकते, असे अमेरिकन संशोधक डॉ. रॉबर्ट डब्ल्यू. मोएलर यांनी त्यांच्या शोधनिबंधात म्हटले आहे. चांगल्या सामाजिक कौशल्यांमुळे आणि जिवाभावाच्या मित्रांमुळे मनातील एकटेपणाची भावना नष्ट होते, ज्याचा थेट सकारात्मक परिणाम आपल्या भावनिक आणि मानसिक आरोग्यावर होतो.

‘द एशिया पॅसिफिक जर्नल ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड इन्फॉर्मेशन’ मधील अभ्यास दर्शवतो की भावना व्यक्त केल्याने मानसिक ताण लक्षणीयरीत्या कमी होतो आणि मित्र समस्येकडे नवीन दृष्टिकोनातून पाहण्यास मदत करतात. मैत्री हे एक सुरक्षित वातावरण तयार करते जे मानसिक आरोग्य सुधारण्यास आणि समस्येचा सामना करण्यासाठी नवीन ऊर्जा देण्यास मदत करते.

मैत्री केवळ मन शांत ठेवत नाही, तर शरीरालाही निरोगी राखते. संकटकाळात आधार देणारे खरे मित्र आपला तणाव कमी करतात आणि हृदयविकारांसारख्या आजारांचा धोका टाळतात. मित्र आपल्याला सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा देतात. अशा सकारात्मक नात्यांमुळे आपले जीवन अधिक आनंदी, निरोगी आणि समृद्ध बनते.

हार्वर्ड मेडिकल स्कूलनुसार, तुमचे सामाजिक संबंध तणाव कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. हा तणाव कमी न झाल्यास तुमच्या हृदयाच्या धमन्या, पचनसंस्था (आतड्यांचे कार्य), इन्सुलिनचे प्रमाण आणि रोगप्रतिकारक शक्तीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. २०२३ मधील एका जागतिक संशोधनात (मेटा-विश्लेषण) धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सामाजिक एकाकीपणामुळे अकाली मृत्यूचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. संशोधकांच्या मते, तीव्र एकाकीपणा हा शरीरासाठी दिवसाला १५ सिगारेट ओढण्याइतका किंवा लठ्ठपणापेक्षाही अधिक घातक असू शकतो.

लोकांशी मैत्री आणि आपुलकीचे नाते निर्माण करणे हाच जीवनाचा खरा आनंद आहे, जो आपण प्रत्येकाने जपला पाहिजे. बदलत्या काळासोबत मैत्रीतील दुरावा किंवा ऱ्हास थांबवायचा असेल, तर संवाद, समजूतदारपणा आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे.

जर तुमची एखादी जुनी, जीवाभावाची मैत्री हळूहळू संपत चालली आहे असे वाटत असेल, तर पुन्हा ती घट्ट करण्यासाठी मोकळा आणि प्रामाणिक संवाद साधा. एकमेकांवर दोषारोप करण्याऐवजी, मित्राशी थेट आणि मनापासून बोला. त्यांना सांगा की, “मला तुझी उणीव भासतेय आणि मला आपली मैत्री पहिल्यासारखीच हवी आहे”.

भूतकाळात काही वाद किंवा गैरसमज झाले असतील, तर इगो (अहंकार) बाजूला ठेवून शांतपणे एकत्र बसा आणि त्या गोष्टी विसरून जा.

व्यस्त दिनचर्येतून आठवड्यातून किमान एकदा फोन करा किंवा फक्त ‘कसा/कशी आहेस?’ असा एक छोटा मेसेज नक्की करा. फोनवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटल्याने नाते अधिक घट्ट होते. एकत्र कॉफी पिणे, कुठेतरी फिरायला जाणे किंवा जुन्या आठवणींच्या ठिकाणी भेट देण्याचे प्लॅन्स करा. वाढदिवस असो, यशाचा आनंद असो किंवा कठीण प्रसंग… तुमच्या मित्राच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहा.

बदलांचा आदर करा आणि स्पेस द्या. वयानुसार शिक्षण, नोकरी, लग्न किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे माणूस बदलतो आणि व्यस्त होतो. त्यांच्या या व्यस्ततेचा आदर करा, स्वतःहून अपेक्षा थोड्या कमी ठेवा आणि त्यांना त्यांची हवी ती स्पेस द्या. तुमचे हे छोटे प्रयत्न विरघळत चाललेल्या मैत्रीला पुन्हा एकदा सुवर्णकाळात घेऊन जाऊ शकतात.

जाता जाता….

कधीतरी आठवून बघू ते जुने दिवस, जेव्हा आपल्या हसण्याला आणि बोलण्याला वेळेचं बंधन नव्हतं.

प्रा. डॉ. संजय छाया त्रिंबकराव खडक्कार,
माजी तज्ज्ञ सदस्य,
विदर्भ वैधानिक विकास मंडळ.
मोबाईल क्रमांक:
7276614260

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!