सायबर गुन्हा घडल्यानंतर उपाय करण्यापेक्षा तो टाळण्यासाठी आधीपासून जागरूक राहणे महत्त्वाचे असल्याचा संदेश कर्मवीर पोलीस भरती ट्रेनिंग सेंटरमधील प्रशिक्षणार्थींना देण्यात आला.
वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर कर्मवीर पोलीस भरती ट्रेनिंग सेंटर येथे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या १५० हून अधिक प्रशिक्षणार्थींसाठी सायबर सुरक्षा जनजागृतीपर मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. यावेळी सायबर वॉरियर योगिता जाधव आणि प्राजक्ता बोरूळे यांनी प्रशिक्षणार्थींना सायबर सुरक्षेच्या विविध पैलूंबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी ऑनलाइन फसवणुकीचे वाढते प्रकार, संशयास्पद लिंक, अनोळखी फोन कॉल व संदेश, बनावट ऑफर्स, सोशल मीडिया फसवणूक तसेच वैयक्तिक माहितीचा गैरवापर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करण्यापूर्वी तिची सत्यता तपासणे, ओटीपी व पासवर्ड कोणालाही न सांगणे, तसेच डिजिटल व्यवहार करताना विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
तसेच सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करताना वैयक्तिक माहिती सार्वजनिक होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचेही प्रशिक्षणार्थींना समजावून सांगण्यात आले. ऑनलाइन फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी संशयास्पद फोन कॉल, संदेश किंवा ऑफर्सना प्रतिसाद देण्यापूर्वी त्यांची खातरजमा करण्याचे आवाहन करण्यात आले.
सायबर गुन्हा घडल्यानंतर त्यावर उपाय करण्यापेक्षा तो घडू नये यासाठी आधीपासूनच जागरूक राहणे अधिक महत्त्वाचे आहे, असा संदेश यावेळी प्रशिक्षणार्थींना देण्यात आला.
या मार्गदर्शन सत्राला १५० हून अधिक प्रशिक्षणार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रशिक्षणार्थींनी सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न विचारत संवाद साधला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
