एक चुकीचा क्लिक, मोठा धोका! लालबहादूर शास्त्री विद्यालयात विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचा कानमंत्र

लातूर येथील श्री लालबहादूर शास्त्री विद्यालयात ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, OTP, संशयास्पद लिंक, सोशल मीडिया सुरक्षा आणि वैयक्तिक माहितीच्या संरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

राजर्षी शाहू महाविद्यालय व क्विक हिल फाऊंडेशनच्या संयुक्त उपक्रमातून लालबहादूर शास्त्री विद्यालय, लातूर येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन.

लातूर : डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता विद्यार्थ्यांनी इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करताना अधिक सजग राहणे आवश्यक आहे. याच उद्देशाने राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर आणि क्विक हिल फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या जनजागृती उपक्रमांतर्गत श्री लालबहादूर शास्त्री विद्यालय, खडगाव रोड, लातूर येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले.

या सत्रात सायबर वॉरिअर नरेश पंडित, अविष्कार कांबळे, प्राची भोसले आणि गायत्री मायकर यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, संशयास्पद लिंक, ओटीपी सुरक्षितता, मजबूत पासवर्ड, सोशल मीडिया सुरक्षा, वैयक्तिक माहितीचे संरक्षण तसेच मोबाईल आणि इंटरनेटचा सुरक्षित वापर याबाबत मार्गदर्शन केले.

सायबर फसवणुकीच्या विविध पद्धतींची उदाहरणांसह माहिती देताना विद्यार्थ्यांना अनोळखी लिंकवर क्लिक करण्यापूर्वी विचार करणे, कोणालाही ओटीपी अथवा वैयक्तिक माहिती शेअर न करणे आणि ऑनलाइन व्यवहार करताना आवश्यक ती खबरदारी घेणे याबाबत विशेष सूचना देण्यात आल्या.

तसेच ऑनलाइन फसवणूक झाल्यास घाबरून न जाता तातडीने राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधण्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. डिजिटल जगतातील सुरक्षित व जबाबदार वर्तनाचे महत्त्वही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

यावेळी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. लहाने सौदागर आणि प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. वळसने व्ही. बी. यांची उपस्थिती लाभली. शिक्षकवृंदाच्या सहकार्याने हे सत्र उत्साहात पार पडले.

सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. ‘एक चुकीचा क्लिक, मोठा धोका’ टाळण्यासाठी डिजिटल वापरात सावधगिरी आणि जागरूकता आवश्यक आहे, असा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!