गोलाणी मार्केटमध्ये तीन दुकानांचे लॉक तोडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण. चार संशयित सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याची माहिती; पोलिसांकडून शोध सुरू.
शहरातील गजबजलेल्या गोलाणी मार्केटमध्ये चोरट्यांनी मध्यरात्री धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. एकाच रात्री चोरट्यांनी तब्बल तीन दुकानांना लक्ष्य केले. यापैकी एका मोबाईल दुकानाचे कुलूप तोडून दुरुस्तीसाठी आलेले अंदाजे ५० हजार रुपये किमतीचे चार मोबाईल चोरून नेण्यात आले. तर अन्य दोन दुकानांचे लॉक तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेतील चार संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती आहे.
सनशाईन मोबाईल दुकानाला लक्ष्य
गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावरील दुकान क्रमांक ८ मधील सनशाईन मोबाईल दुकानाला चोरट्यांनी प्रथम लक्ष्य केले. दुकानमालक सौरभ खियलदास केसवानी यांनी रात्री साडेनऊ वाजता दुकान बंद केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाचे बाजूचे लॉक आणि कडी तुटलेल्या अवस्थेत आढळून आली.
मात्र, दुकानाला असलेल्या सेंट्रल लॉकमुळे चोरट्यांना दुकानात प्रवेश करता आला नाही. या दुकानात अंदाजे ३० ते ३५ लाख रुपयांचा माल असल्याचे सांगण्यात येत आहे. सेंट्रल लॉकमुळे मोठी चोरी टळल्याचे दुकानमालकांकडून सांगण्यात आले.
विशाल मोबाईल दुकानातून चार मोबाईल चोरीला
यानंतर चोरट्यांनी गोलाणी मार्केटच्या पहिल्या मजल्यावरील विशाल मोबाईल दुकानाला लक्ष्य केले. दुकानमालक विशाल मधुकर शिंपी यांना शेजारील दुकानदाराने फोन करून दुकानात चोरी झाल्याची माहिती दिली.
चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर ड्रॉवर फोडून दुरुस्तीसाठी आलेले अंदाजे ५० हजार रुपये किमतीचे चार मोबाईल लंपास केले.
रुद्र फूटवेअर दुकानाचेही लॉक तोडले
चोरट्यांनी याच मजल्यावरील रुद्र फूटवेअर दुकानाचे साईड लॉकही तोडले. मात्र, प्राथमिक माहितीनुसार या दुकानातून कोणताही माल चोरीला गेलेला नाही. या दुकानात सुमारे दोन लाख रुपयांचा माल असल्याचे सांगण्यात येत आहे.
चार संशयित सीसीटीव्हीत कैद
एकाच रात्री एकाच मार्केटमधील तीन दुकानांना लक्ष्य करण्यात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या घटनेतील चार संशयित सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याची माहिती आहे. त्यांच्या हालचाली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे.
या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. चोरीच्या घटनेनंतर गोलाणी मार्केट परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबतही व्यापाऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
