एम. एम. महाविद्यालयात ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ उत्साहात; साहित्य हे समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम; विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासण्याचे आवाहन

पाचोरा येथील एम. एम. महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात साहित्य, वाचन आणि समाजप्रबोधनाच्या भूमिकेवर मार्गदर्शन करण्यात आले.

पाचोरा येथील एम. एम. महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. साहित्याचे महत्त्व आणि वाचन संस्कृतीवर प्रा. डॉ. जतीन मेढे यांनी मार्गदर्शन केले.

पाचोरा : ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी…’ या भावनेतून मराठी भाषेचा अभिमान जागवत पाचोरा येथील एम. एम. महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ उत्साहात साजरा करण्यात आला. सप्ताहानिमित्त ‘पुस्तक समजून घेताना…’ या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव वले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

या कार्यक्रमात प्रमुख वक्ते प्रा. डॉ. जतीन मेढे यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी साहित्याचे महत्त्व विशद करताना, “साहित्य हा समाजमनाचा आरसा आहे. समाजाला त्याचे वर्तमान दाखवून भविष्याची दिशा सूचकतेने मांडण्याचे काम लेखक आपल्या साहित्यातून करत असतो,” असे सांगितले.

साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकास आणि समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम असल्याचेही प्रा. डॉ. मेढे यांनी स्पष्ट केले. विविधांगी वाचनामुळे व्यक्तीच्या विचारांची कक्षा रुंदावते. दर्जेदार ग्रंथांच्या सहवासामुळे व्यक्तिमत्त्व वैचारिकदृष्ट्या समृद्ध होते. जीवनातील सुख-दुःखाच्या प्रसंगांना सामोरे जाताना आवश्यक असलेली वैचारिक परिपक्वता आणि संयम वाचनातून विकसित होतो. त्यामुळे प्रत्येकाने वाचनाची आवड जोपासून ती अधिक समृद्ध करण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापिकांनीही आपण वाचलेल्या विविध पुस्तकांबद्दल आपले अनुभव व विचार व्यक्त केले. त्यामुळे कार्यक्रमाला वैचारिक आणि संवादात्मक स्वरूप प्राप्त झाले.

यावेळी खानदेशच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक तथा माजी प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील, प्रा. डॉ. सुरेश बच्छाव, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. तडवी, प्रा. सोनवणे मॅडम यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.

विद्यार्थिनींसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण उपक्रमाचे कौतुक

दरम्यान, एम. एम. महाविद्यालयाने विद्यार्थिनींसाठी सुरू केलेल्या स्वयंरोजगार प्रशिक्षण उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात सुमारे ३० शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या असून, प्रशिक्षित प्रशिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिले जात आहे.

मान्यवरांनी या प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन उपक्रमाची माहिती घेतली. ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारचे रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपक्रम राबविणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. अशा प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींना कौशल्य प्राप्त होऊन त्या भविष्यात स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!