डी. डी. एस. पी. ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना सायबर क्राईमविषयी मार्गदर्शन

एरंडोल येथील डी. डी. एस. पी. ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना सायबर क्राईम, ऑनलाइन फसवणूक, AI Voice Scam आणि डिजिटल सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. | स्थानिक समाचार | www.sthaniksamachar.com

सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी? एरंडोल येथील डी. डी. एस. पी. ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षेचे मार्गदर्शन.

 डिजिटल माध्यमांचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा व ऑनलाइन फसवणुकीबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने डी. डी. एस. पी. ज्युनिअर कॉलेज, एरंडोल येथे सायबर क्राईमविषयी जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थिनी कुमारी स्नेहल पाटील व कुमारी वैष्णवी पाटील यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांची माहिती दिली. सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित ठेवणे, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, OTP व पासवर्ड कोणालाही न सांगणे, QR कोडच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळणे तसेच ऑनलाइन फसवणूक झाल्यास तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

AI Voice Scam बाबत विशेष मार्गदर्शन

यावेळी AI Voice Scam द्वारे होणाऱ्या फसवणुकीबाबत विद्यार्थ्यांना विशेष माहिती देण्यात आली. ओळखीच्या व्यक्तीचा आवाज हुबेहुब तयार करून पैशांची मागणी करणारे फोन किंवा मेसेज आल्यास त्यावर तात्काळ विश्वास न ठेवता संबंधित व्यक्तीशी स्वतंत्रपणे संपर्क साधून खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले.

सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी डिजिटल व्यवहार करताना सतर्कता बाळगणे, वैयक्तिक माहितीची गोपनीयता जपणे आणि संशयास्पद ऑनलाइन व्यवहारांपासून दूर राहणे आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. 

मार्गदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सायबर सुरक्षा आणि ऑनलाइन फसवणुकीसंदर्भात विविध प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मार्गदर्शकांनी उदाहरणांसह उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले.

कार्यक्रमाला कॉलेजमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!