माय लाइफस्टाईल प्रा. लि.च्या साप्ताहिक बैठकीत सायबर सुरक्षेची जनजागृती

विविध वयोगटांतील नागरिकांनी सायबर धोके ओळखून सुरक्षित डिजिटल सवयी अंगीकाराव्यात, यासाठी लातूरमध्ये सायबर जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.

 माय लाइफस्टाईल प्रा. लि. कंपनीच्या साप्ताहिक बैठकीदरम्यान अधिकारी, कर्मचारी, कामगार, गृहिणी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. एसटीसी एसएस ॲड. दत्ता बोरुळे यांच्या कन्या तथा सायबर वॉरियर प्राजक्ता बोरुळे आणि सायबर वॉरियर योगिता जाधव यांनी या सत्रादरम्यान उपस्थितांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.

दैनंदिन जीवनातील वाढत्या डिजिटल वापराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत सखोल आणि व्यावहारिक माहिती देण्यात आली. ऑनलाइन फसवणूक, संशयास्पद लिंक, बनावट फोन कॉल व संदेश, ओटीपी फसवणूक, बँकिंग फसवणूक, सोशल मीडिया सुरक्षा, वैयक्तिक माहितीची गोपनीयता, लोकेशन शेअरिंग तसेच डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

विशेषतः विविध वयोगटांतील नागरिकांना भेडसावणाऱ्या सायबर धोक्यांचे स्वरूप समजावून सांगण्यात आले. फसवणुकीची घटना घडण्यापूर्वीच संभाव्य धोका ओळखण्यासाठी आवश्यक सायबर सजगता आणि सुरक्षित डिजिटल सवयी यावर विशेष भर देण्यात आला. सहभागींच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत प्रत्यक्ष जीवनातील परिस्थितींशी संबंधित उदाहरणांच्या माध्यमातूनही मार्गदर्शन करण्यात आले.

या सायबर सुरक्षा जनजागृती सत्राला कंपनीतील अधिकारी, कर्मचारी आणि इतर सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डिजिटल युगात प्रत्येक नागरिकाने सायबर सुरक्षेबाबत जागरूक राहणे आवश्यक असून, अशा जनजागृतीपर उपक्रमांमुळे सुरक्षित आणि जबाबदार डिजिटल समाजनिर्मितीस हातभार लागतो, असा संदेश यावेळी देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!