सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे शक्तिप्रदर्शन; जिल्हाधिकारी रोहन घुगे रूट मार्चमध्ये सहभागी

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील संवेदनशील भागांत पोलिसांनी रूट मार्च काढला. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनीही पोलिसांसोबत पायी सहभागी होत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा संदेश दिला.

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांकडून विशेष खबरदारी. संवेदनशील भागांत रूट मार्च काढून शांतता आणि सुरक्षिततेचा संदेश देण्यात आला.

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जळगाव शहर पोलिसांच्या वतीने संवेदनशील भागांत रूट मार्च काढण्यात आला. शहर पोलीस ठाणे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील परिसरातून पोलिसांचे पथसंचलन पार पडले.

या रूट मार्चमध्ये सशस्त्र पोलीस कर्मचारी, शीघ्र कृती दलाचे जवान, दंगा नियंत्रण पथक तसेच मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. पोलिसांच्या ताफ्याने शहरातील विविध संवेदनशील भागांतून संचलन करत नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

या रूट मार्चचे विशेष आकर्षण म्हणजे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्वतः पोलिसांसोबत पायी सहभागी होत पथसंचलन केले. जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून पोलिसांसोबत सहभाग घेतल्याने आगामी सण-उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला.

आगामी काळात विविध धार्मिक सण, उत्सव आणि मिरवणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच संवेदनशील भागांमध्ये शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

रूट मार्चदरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटा शहरातील रस्त्यांवर दिसून आला. पोलिसांच्या या पथसंचलनामुळे असामाजिक प्रवृत्तींना स्पष्ट संदेश देण्यात आला असून, सण-उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!