सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन २०२६-२७ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून, पात्र विद्यार्थ्यांनी १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज अद्ययावत करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.

स्वाधार योजना २०२६-२७ साठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज अद्ययावत करण्याचे आवाहन. अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी अर्जाची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६.

सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या, परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सन २०२६-२७ या वर्षासाठी ऑनलाइन अर्ज करावेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ आहे.

सन २०२४-२५ पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. यापूर्वी ही योजना जिल्हास्तरावर लागू होती. शासन निर्णय दि. २६ डिसेंबर २०२४ अन्वये ती तालुकास्तरावरही लागू करण्यात आली आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असूनही प्रवेश न मिळाल्याने निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेता न येणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. इयत्ता ११ वी व १२ वी तसेच इयत्ता १० वी व १२ वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरांवरील महाविद्यालये व शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी ठराविक रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्यात येते.

मागील वर्षातील स्वाधार योजनेचे विद्यमान विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org/ या संकेतस्थळावर लॉगिन करून सन २०२६-२७ या वर्षासाठी आपले ऑनलाइन अर्ज दि. १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत अद्ययावत करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!