पीडब्ल्यूडीतील शाखा अभियंता ५ लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता योगेश अहिरे यांना प्रलंबित बिल मंजुरीसाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले.

प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी लाखोंची लाच मागितल्याचा आरोप; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागात एसीबीच्या कारवाईने खळबळ.

जळगाव  जिल्ह्यातील लाचखोरीच्या घटनांना आळा बसत नसतानाच शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सार्वजनिक बांधकाम विभागात धडक कारवाई करत शाखा अभियंत्याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी १५ लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप असून तडजोडीनंतर ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील एका नोंदणीकृत कंत्राटदाराने सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध कामे पूर्ण केली होती. संबंधित कामांची लाखो रुपयांची बिले मंजुरीच्या प्रतीक्षेत होती. ही बिले मंजूर करून देण्यासाठी शाखा अभियंता योगेश अहिरे यांनी १५ लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार कंत्राटदाराने एसीबीकडे केली होती.

तक्रारीनंतर एसीबीच्या पथकाने गोपनीयरीत्या पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरात सापळा रचण्यात आला.

तडजोडीनुसार पहिल्या टप्प्यात ५ लाख रुपयांची रक्कम स्वीकारत असताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत शाखा अभियंता योगेश अहिरे यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.

या कारवाईमुळे सार्वजनिक बांधकाम विभागासह शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!