माळप्रिंपी रस्त्यालगतच्या शेतात अडकलेल्या काळवीटांची वेळेवर सुटका; शेतकरी व प्राणीमित्रांच्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक.
पाळधी, ता. जामनेर परिसरातील शेतशिवारात ठिबक सिंचनाच्या नळ्यांमध्ये शिंगे अडकून तडफडणाऱ्या हरणाला शेतकरी, सर्पमित्र आणि प्राणीमित्रांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाल्याची हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे.
माळप्रिंपी रस्त्यालगत अमजद अब्बास पठाण यांच्या शेतामध्ये दोन काळवीट हरणांची शिंगे ठिबक सिंचनाच्या नळ्यांमध्ये अडकली होती. शिंगे घट्ट अडकल्याने हरणे बराच वेळ तडफडत होती आणि स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत होती. ही बाब शेजारील शेतकरी निळकंठ शिवदास माळी यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ सर्पमित्र तथा प्राणीमित्र नाना माळी यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.
माहिती मिळताच नाना माळी यांनी घटनास्थळी धाव घेत शांतपणे परिस्थिती हाताळली. त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक ठिबकच्या नळ्या कापून हरणांची सुटका केली. काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर दोन्ही काळवीटांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. सुटका होताच हरणांनी जंगलाच्या दिशेने धाव घेतल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
या घटनेची माहिती जामनेर वनविभागाचे कर्मचारी अशोक ठोंबरे यांनाही देण्यात आली. वेळेवर मदत आणि माणुसकीची भावना जपत शेतकरी, सर्पमित्र आणि प्राणीमित्रांनी एका मुक्या जीवाला दिलेले हे जीवदान परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.

करण शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात.स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे प्राधिनिधी असून बातम्या आणि जाहिरातींकरीता संपर्क करावा-
✍️ करण (गुरू) शिंदे -8983956862
ईमेल- journalistgurubaba@gmail.com
