इतर मागासवर्गीयांसाठी विविध कर्ज, व्याज परतावा योजनांना सुरुवात; ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत जळगाव जिल्ह्यात विविध कर्ज, व्याज परतावा, शैक्षणिक आणि कौशल्य विकास योजनांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू; पात्र लाभार्थ्यांनी वेळेत अर्ज करण्याचे आवाहन.

जळगाव जिल्ह्यात ओबीसी नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी सात विविध योजना सुरू. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून पात्र लाभार्थ्यांनी तातडीने अर्ज करावेत.

 महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय जळगाव तसेच महामंडळाच्या विविध उपकंपन्यांमार्फत इतर मागासवर्गीय नागरिकांच्या आर्थिक उन्नती, स्वावलंबन आणि विकासासाठी विविध कर्ज व व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहेत. पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

महामंडळांतर्गत संत काशिबा गुरव, जगदज्योती महात्मा बसवेश्वर, संत सेनाजी महाराज केशशिल्पी, संत नरहरी महाराज, संत श्री संताजी महाराज, संत श्री रुपलाल महाराज, स्व. विष्णुपंत रामचंद्र दादरे (लोणारी), सोळा कुलस्वामिनी, श्री संत शिरोमणी नामदेव महाराज समस्त शिंपी समाज, संत भोजलिंग काका सुतार, लेवा पाटीदार समाज, सरदार वल्लभ पटेल गुजर समाज आणि आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ या उपकंपन्यांचा समावेश आहे.

सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यासाठी भौतिक व आर्थिक उद्दिष्टे निश्चित करण्यात आली असून सर्व योजनांची उद्दिष्टे शंभर टक्के पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्हा कार्यालयामार्फत २० टक्के बीज भांडवल योजना, एक लाख रुपयांपर्यंतची थेट कर्ज योजना, बँकेमार्फत १५ लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावरील व्याज परतावा योजना, १० ते ५० लाख रुपयांपर्यंतची गट कर्ज व्याज परतावा योजना, १० ते २० लाख रुपयांपर्यंतची शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना तसेच कौशल्य विकास योजना अशा सात योजना राबविण्यात येत आहेत.

महामंडळाच्या सर्व योजना पूर्णपणे ऑनलाइन स्वरूपात राबविण्यात येत असून पात्र अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह www.msobcfdc.org या संकेतस्थळावर अर्ज करणे बंधनकारक आहे.

योजनांबाबत अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पहिला मजला, मायादेवी शनी मंदिराजवळ, जळगाव येथे किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५७-२२६१९१८ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!