ताल पोवाड्याचा, संदेश सायबर सुरक्षेचा! शेडोळमध्ये सायबर योद्ध्यांचा अनोखा जागर; पारंपरिक पोवाड्यातून आधुनिक डिजिटल सुरक्षेचा संदेश; गावकरी व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शेडोळ येथे सायबर वॉरियर्सनी पारंपरिक पोवाड्याच्या माध्यमातून गावकरी आणि विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, OTP व डिजिटल सुरक्षेबाबत जनजागृती केली.

पारंपरिक पोवाड्याच्या माध्यमातून ग्रामीण नागरिकांना डिजिटल सुरक्षिततेचा संदेश; शेडोळ येथील सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर आणि क्विक हील फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत शेडोळ येथे गावकरी आणि शालेय विद्यार्थ्यांसमोर सायबर सुरक्षेवर आधारित अनोख्या पोवाड्याचे सादरीकरण करण्यात आले. पारंपरिक पोवाड्याच्या माध्यमातून आधुनिक डिजिटल युगातील सायबर सुरक्षेचा संदेश देत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गड-किल्ल्यांच्या रक्षणासाठी मावळे सज्ज असायचे; त्याचप्रमाणे आजच्या डिजिटल युगात आपल्या डिजिटल जगाच्या रक्षणासाठी सायबर योद्धे सज्ज आहेत, हा प्रभावी संदेश पोवाड्यातून देण्यात आला. पारंपरिक कलेला आधुनिक विषयाची जोड देण्यात आल्याने या उपक्रमाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

पोवाड्यातून ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, अनोळखी व संशयास्पद लिंक, ओटीपी, पासवर्ड, वैयक्तिक माहितीची सुरक्षितता आणि सुरक्षित डिजिटल व्यवहार याबाबत जनजागृती करण्यात आली. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांनी अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करण्यापूर्वी सावध राहावे तसेच कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास योग्य ती खबरदारी घ्यावी, असा संदेश देण्यात आला.

या पोवाड्याच्या सादरीकरणात सायबर वॉरियर्स अविष्कार कांबळे, नरेश पंडित, आयुष जोशी, प्राची भोसले, गायत्री मायकर आणि पायल साबणे यांनी सहभाग घेतला. त्यांच्या प्रभावी सादरीकरणाला गावकरी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पोवाड्यानंतर उपस्थितांनी सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या. त्यांचे निरसन करून उपस्थितांना डिजिटल सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

पारंपरिक लोककलेच्या प्रभावी माध्यमातून सायबर सुरक्षेचा संदेश ग्रामीण भागातील नागरिक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आल्याने या उपक्रमाला विशेष प्रतिसाद मिळाला. डिजिटल युगातील सुरक्षिततेसाठी जनजागृतीसोबतच सायबर सुरक्षेची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याची गरज या उपक्रमातून अधोरेखित झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!