“सावधानता हीच सायबर सुरक्षेची पहिली पायरी” या संदेशातून वयोवृद्ध नागरिकांना डिजिटल व्यवहार करताना सतर्क राहण्याचे आवाहन.
लातूर : वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर वयोवृद्ध नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी भारत विकास परिसर येथे सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध महत्त्वपूर्ण बाबी समजावून सांगण्यात आल्या.
Quick Heal Foundation यांच्या वतीने सायबर वॉरियर्स नेहल बुलानी, जाधव साहील, परमेश्वर पांद्रे आणि नम्रता तौर यांनी उपस्थित नागरिकांना लाईव्ह हॅकिंग डेमोच्या माध्यमातून सायबर गुन्हे कशा प्रकारे घडू शकतात, याचे प्रात्यक्षिक दाखवले.
यावेळी OTP फसवणूक, बनावट लिंक, फेक कॉल, ऑनलाइन आर्थिक फसवणूक आणि वैयक्तिक माहितीचा गैरवापर यांसारख्या सायबर धोक्यांबाबत नागरिकांना सतर्क करण्यात आले. अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या कॉल, संदेश किंवा लिंकवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची खातरजमा करण्याचे आवाहन करण्यात आले.
“सावधानता हीच सायबर सुरक्षेची पहिली पायरी आहे,” असा संदेश देत कोणालाही OTP, PIN, पासवर्ड किंवा बँकिंगशी संबंधित गोपनीय माहिती देऊ नये, असे आवाहन करण्यात आले.
लाईव्ह डेमो आणि संवादात्मक मार्गदर्शनाला उपस्थित वयोवृद्ध नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डिजिटल व्यवहार करताना अधिक सतर्क राहण्याचा आणि सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचा संकल्प यावेळी नागरिकांनी व्यक्त केला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
