एका क्लिकची चूक, मोठा धोका! प्रतिभा निकेतन विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; २५० हून अधिक विद्यार्थ्यांना फोटो मॉर्फिंग, AI, ऑनलाइन फसवणूक आणि डिजिटल गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

२५० हून अधिक विद्यार्थ्यांना फोटो मॉर्फिंग, AI, ऑनलाइन फसवणूक आणि डिजिटल गोपनीयतेबाबत मार्गदर्शन.

लातूरच्या प्रतिभा निकेतन विद्यालयात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सायबर सुरक्षेशी संबंधित प्रश्न विचारले; जबाबदार डिजिटल नागरिक बनण्याचे आवाहन.

लातूर : डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर आणि Quick Heal Foundation, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या जनजागृती उपक्रमांतर्गत प्रतिभा निकेतन विद्यालय, लातूर येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले.

या एकदिवसीय प्रशिक्षणादरम्यान इयत्ता पाचवी ते दहावीच्या २५० हून अधिक विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी सायबर ऑफिसर योगिता जाधव आणि सायबर ऑफिसर प्राजक्ता बोरुळे यांनी विद्यार्थ्यांना फोटो मॉर्फिंग, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून फोटो तयार करण्याची प्रक्रिया, AIचा सुरक्षित व जबाबदारीने वापर तसेच मजबूत पासवर्ड तयार करण्याचे महत्त्व उदाहरणांसह समजावून सांगितले.

मोबाईलमध्ये कोणतेही ॲप डाउनलोड करताना मागितल्या जाणाऱ्या परवानग्यांकडे काळजीपूर्वक पाहणे, आवश्यक नसलेल्या परवानग्या टाळणे आणि ॲप वापरताना वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणे याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

याशिवाय ऑनलाइन फसवणूक, बनावट संकेतस्थळांच्या लिंकपासून सावध राहणे, OTP फसवणूक, सोशल मीडिया सुरक्षितता आणि डिजिटल गोपनीयता यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही माहिती देण्यात आली.

संवादात्मक पद्धतीने झालेल्या या सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न विचारले. प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डिजिटल जगातील संभाव्य धोके आणि सुरक्षित डिजिटल सवयी यांची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक कलशेट्टे यांचे मार्गदर्शन लाभले. आयोजनासाठी विद्यालयातील समस्त शिक्षक व इतर सदस्यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी सुरक्षित डिजिटल सवयी अंगीकारून जबाबदार डिजिटल नागरिक बनावे, असे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!