सदानंद शाळेत विद्यार्थ्यांना लाईव्ह हॅकिंग डेमोद्वारे सायबर सुरक्षेचे धडे

लातूर येथील सदानंद शाळेत ४५० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी क्विक हील फाउंडेशनच्या वतीने सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. लाईव्ह हॅकिंग डेमोद्वारे लोकेशन सुरक्षा, फोटो मॉर्फिंग, व्हॉइस क्लोनिंग आणि डीपफेकबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

सदानंद शाळेतील विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्राचार्य, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

वाढत्या सायबर धोक्यांच्या पार्श्वभूमीवर क्विक हील फाउंडेशनच्या वतीने सदानंद शाळेत विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शाळेच्या प्रार्थनेच्या वेळी घेण्यात आलेल्या या उपक्रमात सुमारे ४५० हून अधिक विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.

यावेळी तुषार वाघमारे, साहिल जाधव आणि आदित्य माने यांनी विद्यार्थ्यांसमोर लाईव्ह हॅकिंग डेमो सादर करत ऑनलाइन जगातील संभाव्य धोके प्रात्यक्षिकातून समजावून सांगितले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या डिजिटल वापराच्या सवयी जाणून घेण्यात आल्या. चुकीच्या पद्धतीने लोकेशन शेअर करणे किंवा वैयक्तिक माहिती सार्वजनिक करणे यामुळे कोणते धोके निर्माण होऊ शकतात, याबाबत विद्यार्थ्यांना सतर्क करण्यात आले. विशेषतः लोकेशन अनोळखी व्यक्तींशी शेअर करू नये, असा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

यासोबतच विद्यार्थ्यांना फोटो मॉर्फिंग, व्हॉइस क्लोनिंग आणि डीपफेकिंग म्हणजे काय, त्यांचा गैरवापर कोणत्या प्रकारे होऊ शकतो आणि अशा घटनांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत डिजिटल सुरक्षेबाबतच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या सत्राला शाळेचे प्राचार्य, शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण सत्र पाहून उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या डिजिटल सुरक्षेसाठी अशा प्रकारचे मार्गदर्शन आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी क्विक हील फाउंडेशनच्या टीमला पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी क्विक हील फाउंडेशनच्या टीममधील तुषार वाघमारे, आदित्य माने, साहिल जाधव, नेहल बुलानी, नम्रता तोर आणि परमेश्वर पांढरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!