गणेशोत्सवाच्या माध्यमातून सायबर सुरक्षेचा संदेश; लातूरच्या राजश्री नगरातील नागरिकांना डिजिटल व्यवहार, वैयक्तिक माहिती आणि ऑनलाइन फसवणुकीबाबत सावधगिरीचे मार्गदर्शन.
लातूर : राजश्री नगर, बसवेश्वर चौक येथील परमवीर गणेश मंडळात क्विक हील फाउंडेशनतर्फे सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी साहिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वर पांढरे यांनी उपस्थित नागरिकांसमोर प्रत्यक्ष लाईव्ह हॅकिंग डेमो सादर केला.
लाईव्ह डेमोच्या माध्यमातून मोबाईल आणि इंटरनेट वापरताना होणाऱ्या छोट्या चुका कशा धोकादायक ठरू शकतात, हे प्रत्यक्ष उदाहरणांसह दाखवून देण्यात आले. डेमो पाहून उपस्थित नागरिक आश्चर्यचकित झाले. त्यानंतर नागरिकांना डिजिटल सेफ्टी कशी राखावी, ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, संशयास्पद लिंक आणि OTP पासून कसे सुरक्षित राहावे, तसेच वैयक्तिक माहितीची गोपनीयता कशी जपावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सायबर सुरक्षेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम राबविण्यात आला. डिजिटल व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे आणि संवेदनशील माहिती कोणासोबतही शेअर न करणे, याबाबत उपस्थितांना जागरूक करण्यात आले.
यावेळी नेहल बुलानी, नम्रता तोर, श्रेयस माकणे, तुषार वाघमारे आणि आदित्य माने यांच्यासह क्विक हील फाउंडेशनची टीम उपस्थित होती.
“उत्सवाचा आनंद घ्या, पण डिजिटल जगात सावध राहा,” असा संदेश या उपक्रमातून नागरिकांना देण्यात आला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
