मुक्ताईनगरच्या ऐतिहासिक व आध्यात्मिक वारशाची ओळख, भारतीय संस्कार आणि मूल्यशिक्षण या उद्देशाने संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
विद्या भारती शैक्षणिक मंडळ, अमरावतीद्वारे संचलित संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूल, मुक्ताईनगर येथे आदिशक्ती संत मुक्ताबाई यांचा जन्मोत्सव उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कार रुजविणे, संत मुक्ताबाई यांच्या अलौकिक कर्तृत्वाची ओळख नव्या पिढीला करून देणे आणि मुक्ताईनगरच्या ऐतिहासिक व आध्यात्मिक वारशाची जाणीव निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. 
मुक्ताईनगर ही केवळ प्रशासकीय तालुक्याची ओळख नसून आदिशक्ती संत मुक्ताबाई यांच्या समाधीस्थळामुळे आणि कार्यपरंपरेमुळे या परिसराला विशेष ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. हा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, या हेतूने शालेय स्तरावर प्रथमच अशा स्वरूपाच्या जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. विद्या भारती शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री. रावसाहेबदादा शेखावत यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या नाट्यप्रयोगाने वेधले लक्ष
जन्मोत्सवाचे प्रमुख आकर्षण विद्यार्थ्यांनी सादर केलेला ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा…’ हा हृदयस्पर्शी नाट्यप्रयोग ठरला. या सादरीकरणातून संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताबाई यांच्यातील भावाबहिणीचे अलौकिक नाते तसेच संतपरंपरेतील विचार आणि मूल्यांचे प्रभावी दर्शन घडविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या अभिनयाने उपस्थित मान्यवर आणि पालकांची मने जिंकली.
यावेळी विद्यार्थ्यांनी जलसंवर्धनाच्या महत्त्वावर आधारित प्रबोधनात्मक नृत्यही सादर केले. या सादरीकरणातून संतविचारांसोबतच सामाजिक जाणीव, पर्यावरण संवर्धन आणि पाण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे उपस्थित पालक आणि मान्यवरांनी कौतुक केले. 
मान्यवरांनी केले संतविचारांचे महत्त्व अधोरेखित
कार्यक्रमाला संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष श्री. भैय्यासाहेब रवींद्र पाटील, संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे प्रमुख ह.भ.प. गुरुवर्य श्री. रवींद्र हरणे महाराज, ह.भ.प. श्री. भाऊराव पाटील, ह.भ.प. श्री. पुरुषोत्तम वंजारी, ह.भ.प. श्री. पंकज महाराज, श्री. अमोल महाराज, ह.भ.प. सौ. दुर्गाताई मराठे, संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नितीन काटे आणि एस. एम. कॉलेजचे श्री. जगदीश सिसोदिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना श्री. भैय्यासाहेब रवींद्र पाटील म्हणाले, “ज्या वयात आजची मुलं मोबाईलमध्ये अडकतात, त्या वयात मुक्ताबाईंनी आपल्या प्रगल्भ ज्ञानाने थोरा-मोठ्यांना जीवनाचा मार्ग दाखवला.” त्यांच्या या वक्तव्यातून संत मुक्ताबाई यांच्या ज्ञानाचे, विचारांचे आणि व्यक्तिमत्त्वाचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आले.
ह.भ.प. श्री. रवींद्र हरणे महाराज आणि ह.भ.प. श्री. भाऊराव पाटील महाराज यांनीही संत मुक्ताईंच्या चरित्राची माहिती देत त्यांच्या जीवनातील संस्कार, विचार आणि मूल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. 
इतिहास, संस्कार आणि अभिव्यक्ती विकासावर भर
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मुक्ताईनगरच्या इतिहासाची ओळख करून देणे, त्यांच्यामध्ये भारतीय संस्कार व नैतिक मूल्यांची रुजवण करणे आणि नाट्य, नृत्य यांसारख्या कलात्मक सादरीकरणांतून त्यांच्या अभिव्यक्ती कौशल्याचा विकास करणे, या उद्दिष्टांवर भर देण्यात आला. संतांच्या जीवनकार्याची ओळख केवळ पुस्तकी ज्ञानापुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्यक्ष सादरीकरणातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पल्लवी तिजारे यांनी केले, तर शाळेचे प्राचार्य श्री. दीपक पाटील यांनी आभार मानले. प्राचार्य श्री. दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कु. आशा पाटील, सौ. सुजाता पाटील, सौ. महेश्वरी माहिरे आणि इतर शिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले. कार्यक्रमाला पालकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
