सावखेडा येथील राधाकृष्ण वारकरी संप्रदाय मंडळात शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू. विद्युत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.
जळगाव शहराजवळील सावखेडा शिवारात विजेचा धक्का लागून १४ वर्षीय वारकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (९ ऑक्टोबर) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. चिन्मय मंगेश सपकाळे (रा. जुने जळगाव, गोपाळपुरा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सपकाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
चिन्मय गेल्या दोन वर्षांपासून सावखेडा शिवारातील राधाकृष्ण वारकरी संप्रदाय मंडळात वारकरी शिक्षण घेत होता. शुक्रवारी सकाळी शाळेच्या परिसरात उघड्यावर असलेल्या बोरिंगच्या मोटारीची विद्युत वायर त्याच्या पायात अडकली. त्यामुळे इलेक्ट्रिक पिन बाहेर निघून मोटार बंद पडली.
बंद पडलेली मोटार पुन्हा सुरू करण्यासाठी चिन्मय पिन जोडण्याचा प्रयत्न करत असताना त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर परिसरातील सहकाऱ्यांनी चिन्मयला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
चिन्मयच्या पश्चात वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे. अवघ्या १४ वर्षांच्या मुलाचा अकाली मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
या घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शाळेच्या परिसरात उघड्यावर असलेल्या विद्युत वायरमुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील विद्युत सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा ठिकाणी विद्युत उपकरणे आणि वायर सुरक्षित ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
