सावदा येथे प्रथमच कॉकरोच जनता पार्टीची जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण बैठक ;‘स्कूल ठीक करो आंदोलन’ आणि ‘क्या बोलती पब्लिक?’ अभियानाच्या नियोजनावर चर्चा

सावदा येथे कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय बैठकीत ‘स्कूल ठीक करो आंदोलन’ आणि ‘क्या बोलती पब्लिक?’ अभियानाच्या नियोजनासह जळगाव जिल्ह्यातील शाळा व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

सावदा येथे कॉकरोच जनता पार्टीच्या बैठकीत संस्थापक अभिजीत दिपके यांच्या जळगाव दौऱ्यासह युवक संघटन मजबूत करण्याबाबत नियोजन.

 सावदा येथे कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने प्रथमच जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. दिनांक २९ ऑगस्ट रोजी कृष्णा इंग्लिश मीडियम स्कूलजवळ झालेल्या या बैठकीत आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या ‘स्कूल ठीक करो आंदोलन’ आणि ‘क्या बोलती पब्लिक?’ या अभियानांबाबत जिल्हास्तरीय नियोजन करण्यात आले.

या बैठकीस कॉकरोच जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य तसेच जळगाव जिल्हा आणि विविध तालुक्यांतील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळांच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा

बैठकीत जळगाव जिल्ह्यातील शाळांची सद्यस्थिती, विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधा आणि शिक्षण व्यवस्थेतील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील शाळांमधील प्रश्नांना व्यापक स्वरूप देऊन ‘स्कूल ठीक करो आंदोलन’ जिल्हाभर प्रभावीपणे राबविण्याबाबत नियोजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा, शाळांची परिस्थिती आणि शिक्षणाशी संबंधित प्रश्नांचा अभ्यास करून त्यावर लोकशाही मार्गाने पाठपुरावा करण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.

संस्थापक अभिजीत दिपके यांचा जळगाव जिल्हा दौरा

बैठकीत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांचा लवकरच जळगाव जिल्हा दौरा आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्याबाबत चर्चा करण्यात आली.

‘क्या बोलती पब्लिक?’ अभियानाची तयारी

आगामी काळात कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने ‘क्या बोलती पब्लिक?’ हे अभियान सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, युवक तसेच विविध घटकांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्या संबंधित प्रशासनासमोर मांडण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

युवकांनी संघटितपणे काम करण्याचे आवाहन

जळगाव जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक प्रश्नांवर युवकांनी संघटितपणे काम करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. विविध प्रश्नांचा अभ्यास करून त्यावर जनजागृती, लोकशाही मार्गाने आंदोलने आणि प्रशासकीय पाठपुरावा करण्याचे नियोजन करण्यात आले.

बैठकीला कॉकरोच जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्यांसह जळगाव जिल्ह्यातील आणि विविध तालुक्यांतील युवक उपस्थित होते. आगामी काळात जळगाव जिल्ह्यात संघटन अधिक मजबूत करून जनतेच्या प्रश्नांसाठी व्यापक पातळीवर काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!