महाविद्यालयीन सहाय्यक प्राध्यापक भरतीत पारदर्शकता आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्याची मागणी. प्रा. डॉ. एल. ए. पाटील यांनी उच्च शिक्षण संचालकांकडे निवेदन सादर केले.
महाराष्ट्रातील महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेत पारदर्शकता, वस्तुनिष्ठता आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्यात यावे, तसेच ११ फेब्रुवारी २०२६ रोजीचा भरतीसंदर्भातील शासन निर्णय (जीआर) रद्द करून पवित्र प्रणालीसारखी संगणकीय ऑनलाइन पारदर्शक भरती व्यवस्था लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी माजी प्राचार्य प्रा. डॉ. एल. ए. पाटील यांनी उच्च शिक्षण संचालक, पुणे यांना निवेदन दिले आहे.
या मागण्यांची पूर्तता न झाल्यास २२ सप्टेंबर २०२६ पासून उच्च शिक्षण संचालक, पुणे यांच्या कार्यालयासमोर शांततेच्या आणि सनदशीर मार्गाने उपोषण करण्याचा इशारा प्रा. डॉ. पाटील यांनी दिला आहे. या आंदोलनात इतर अन्यायग्रस्त उमेदवारही सहभागी होणार असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
११ फेब्रुवारीच्या जीआरवर आक्षेप
प्रा. डॉ. पाटील यांनी २८ ऑगस्ट २०२६ रोजी उच्च शिक्षण संचालक प्रा. डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीसाठी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मात्र, या जीआरमध्ये सहाय्यक प्राध्यापक भरतीची सविस्तर कार्यपद्धती स्पष्ट करण्यात आलेली नाही.
त्याच दिवशी विद्यापीठ विभागांमधील भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयात मात्र भरतीची तपशीलवार कार्यपद्धती नमूद करण्यात आली आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागांमधील सहाय्यक प्राध्यापकांच्या पदनाम, वेतन आणि शैक्षणिक कार्यात साम्य असल्याने भरतीची कार्यपद्धतीदेखील समान असावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
औरंगाबाद खंडपीठाच्या निकालाचा दाखला
प्रा. पाटील यांनी जनहित याचिका क्रमांक २६/२०२४ मधील २४ एप्रिल २०२६ रोजीच्या औरंगाबाद खंडपीठाच्या अंतिम निकालाचा संदर्भ देत भरती प्रक्रिया यूजीसीच्या नियमांचे काटेकोर पालन करून पारदर्शक, वस्तुनिष्ठ, विश्वासार्ह आणि गुणवत्तेवर आधारित असणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.
त्यांच्या मते, या पार्श्वभूमीवर ११ फेब्रुवारीचा जीआर रद्द करून पवित्र पोर्टलप्रमाणे संगणकीय ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापकांची भरती करण्यासाठी नवीन जीआर काढणे आवश्यक आहे.
गुणांकन पद्धतीत बदलाची मागणी
महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी १०० गुणांची स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ विभागणी करावी, अशी प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
नवीन जीआरमध्ये ६०:३०:१० या प्रमाणात गुणांची विभागणी करण्याचा प्रस्ताव प्रा. पाटील यांनी दिला आहे.
- ६० टक्के गुण – उमेदवाराची शैक्षणिक कामगिरी व पात्रता यासाठी द्यावेत.
- ३० टक्के गुण – यामध्ये २० टक्के लेखी परीक्षा आणि १० टक्के वर्गातील अध्यापन कौशल्य तपासणीसाठी विषयतज्ज्ञांकडून गुणांकन करावे.
- १० टक्के गुण – विद्यापीठ निवड समितीने घेतलेल्या मुलाखतीसाठी ठेवावेत.
UGC Regulations मधील Table 3B च्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून उमेदवारांना शॉर्टलिस्ट करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
Ph.D., NET आणि SET गुणांबाबत फेरविचाराची मागणी
Ph.D. पदवीधारकांना गुणवत्ता यादीत मिळणाऱ्या गुणांबाबतही प्रा. पाटील यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यांच्या मते, Ph.D. उमेदवाराला मोठ्या प्रमाणात गुण मिळत असल्याने NET किंवा SET उत्तीर्ण उमेदवारांच्या तुलनेत त्याला गुणवत्ता यादीत अधिक फायदा मिळतो.
त्यामुळे NET, SET आणि Ph.D. यांना प्रत्येकी १० गुण पात्रतेसाठी द्यावेत, तर Ph.D.चा दर्जा संशोधनपर लेखांच्या आधारे तपासून त्यासाठी स्वतंत्र २१ गुण देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यामुळे Ph.D. पदवीधारकांची पात्रता कायम राहण्याबरोबरच त्यांच्या संशोधनाच्या गुणवत्तेचाही विचार होईल, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
NET, SET, SLET उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी
सहाय्यक प्राध्यापकपदासाठी NET, SET किंवा SLET उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याचा UGC Regulations मधील संदर्भ देत अशा उमेदवारांचा निवड प्रक्रियेत प्राधान्याने विचार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पवित्र पोर्टलसारखी ऑनलाइन प्रणाली लागू करण्यावर भर
संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक, वस्तुनिष्ठ, विश्वासार्ह आणि पडताळण्याजोगी करण्यासाठी पवित्र प्रणालीप्रमाणे किंवा गुजरात राज्यातील भरती प्रक्रियेप्रमाणे संगणकीय ऑनलाइन प्रणाली विकसित करून ती महाराष्ट्रात लागू करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच संलग्न महाविद्यालयांमधील मुलाखत प्रक्रिया संबंधित विद्यापीठांमध्ये केंद्रीकृत पद्धतीने घेण्यात यावी, अशीही मागणी आहे.
मुलाखतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची मागणी
सहाय्यक प्राध्यापक भरतीतील मुलाखत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी संपूर्ण मुलाखतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे आणि हे रेकॉर्डिंग पुढील पाच वर्षे जतन करून ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रा. पाटील यांच्या मते, यामुळे मुलाखतीच्या प्रक्रियेबाबत भविष्यात कोणतेही आक्षेप निर्माण झाल्यास संबंधित प्रक्रिया पडताळता येऊ शकणार आहे.
नवीन जीआर होईपर्यंत भरती जाहिरातींना स्थगितीची मागणी
पवित्र पोर्टलसारखी संगणकीय ऑनलाइन पारदर्शक प्रणाली समाविष्ट असलेला नवीन शासन निर्णय प्रसिद्ध होईपर्यंत राज्यातील महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापकांच्या रिक्त जागांच्या भरतीसाठी नवीन जाहिराती प्रसिद्ध करू नयेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींनाही तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
२२ सप्टेंबरपासून पुण्यात उपोषणाचा इशारा
वरील मागण्या मान्य न झाल्यास २२ सप्टेंबर २०२६ पासून उच्च शिक्षण संचालकांच्या पुणे कार्यालयासमोर शांततेच्या व सनदशीर मार्गाने उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रा. डॉ. एल. ए. पाटील यांनी दिला आहे.
या आंदोलनात इतर अन्यायग्रस्त उमेदवार सहभागी होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्राचे राज्यपाल, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, उच्च शिक्षण विभागाचे अपर सचिव तसेच शिवाजीनगर पोलीस ठाणे, पुणे यांना पाठविण्यात आल्या आहेत.
प्रा. डॉ. पाटील यांनी निवेदनासोबत शासन निर्णय, UGC Regulations तसेच संबंधित न्यायालयीन आदेशांच्या प्रती जोडल्याचेही नमूद केले आहे.
आता शासन आणि उच्च शिक्षण विभाग या मागण्यांवर कोणती भूमिका घेतात आणि प्रस्तावित उपोषणाबाबत प्रशासनाकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे राज्यातील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
