इलेक्ट्रिक कार की हायड्रोजन कार? भविष्यातील वाहतुकीचा पर्याय कोणता?

इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता वापर आणि हायड्रोजन तंत्रज्ञानाची भविष्यातील क्षमता; वैयक्तिक वाहतुकीसाठी ईव्ही तर अवजड व लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी हायड्रोजन महत्त्वाचा पर्याय ठरण्याची शक्यता.

भारताच्या स्वच्छ वाहतुकीच्या भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांचे वर्चस्व राहणार की हायड्रोजन वाहनांचा विस्तार होणार? जाणून घ्या ईव्ही आणि हायड्रोजन कारमधील महत्त्वाचे फरक.

भारतातील पहिली हायड्रोजन रेल्वे १७ जुलै २०२६ पासून हरियाणातील जींद आणि सोनीपत मार्गावर सुरू झाली. ही १० डब्यांची स्वदेशी ट्रेन हायड्रोजन इंधन सेल तंत्रज्ञानाचा वापर करते. यामुळे कार्बन उत्सर्जनाऐवजी केवळ पाण्याची वाफ बाहेर पडते. त्यामुळे पर्यावरणात प्रदूषण होत नाही, तसेच दररोज डिझेलची बचत होते. मग काय, अशाच तंत्रज्ञानावर आधारित हायड्रोजन कार पेट्रोल किंवा इलेक्ट्रिक कारला (ईव्ही) पर्याय होऊ शकते का?

सध्या हायड्रोजन कार व्यावसायिकरित्या (सर्वसामान्यांसाठी विक्रीसाठी) उपलब्ध नाहीत. सध्या या गाड्या केवळ प्रायोगिक किंवा पायलट प्रोजेक्ट स्तरावर आहेत. हायड्रोजन कारमध्ये फ्यूएल सेल स्टॅक नावाचे यंत्र असते. कारच्या कार्बन फायबर टाकीत हायड्रोजन वायू भरला जातो. कार सुरू झाल्यावर हायड्रोजन थेट इंजिनमध्ये जळत नाही. तर टाकीतील हायड्रोजन वायू आणि वातावरणातील ऑक्सिजन यांची सेलमध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन वीज तयार होते, ज्यावर कारची मोटार चालते. या प्रक्रियेत कचरा किंवा धूर निघत नाही, तर फक्त शुद्ध पाणी सायलेन्सरमधून बाहेर पडते.

आता हे बघणे जरूरीचे की सध्या लोकप्रिय होत असलेली ईव्ही कार चांगली की येणारी हायड्रोजन कार? इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन कार या दोन्ही पर्यावरणपूरक असून ईव्ही कार बॅटरीमध्ये वीज साठवून चालतात, तर हायड्रोजन कार हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या प्रक्रियेतून स्वतः वीज निर्माण करतात. हायड्रोजन वायू हा कारमध्ये हायड्रोजन पंपावर भरला जातो, तर ईव्ही कार ही घरीच किंवा चार्जिंग स्टेशनवर चार्ज करता येते.

कारच्या बॅटरीच्या क्षमतेनुसार, पूर्ण चार्ज होण्यासाठी साधारण ३० मिनिटांपासून ते १२ तास वेळ लागू शकतो; पण हायड्रोजन कारमध्ये इंधन भरण्यासाठी फक्त ३ ते ५ मिनिटे लागतात. सध्या भारतात ईव्ही कार चार्जिंग स्टेशनचे जाळे वेगाने वाढत आहे, तर हायड्रोजन पंपांची उपलब्धता खूपच कमी आहे.

सध्या भारतात ईव्ही कार या ७ ते २५ लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत, तर हायड्रोजन कार महाग आहेत. हायड्रोजनची किंमत ६० ते ७० रुपये प्रति किलोपर्यंत गेल्यास, तसेच ईव्ही कारचा प्रति किलोमीटर खर्च ८० पैशांपासून १.५० रुपयांपर्यंत आहे, तर हायड्रोजन कारचा खर्च ४ ते ५ रुपये प्रति किलोमीटर असेल. भारतात पेट्रोल कारचा खर्च साधारणपणे प्रति किलोमीटर ८ ते १० रुपये आहे.

हायड्रोजन वायूची वाहतूक आणि साठवणूक हा हायड्रोजन वाहनांचा मुख्य तोटा आहे. हायड्रोजनची साठवणूक वायू किंवा द्रव अवस्थेत असली, तरी वाहतुकीदरम्यान गळतीमुळे नेहमीच नुकसान होते. तसेच हायड्रोजनला संकुचित करण्यासाठी किंवा द्रवरूप करण्यासाठी अधिक ऊर्जेची आवश्यकता असते. या प्रक्रियेमुळे हायड्रोजन वाहनांची एकूण ऊर्जा कार्यक्षमता कमी होते.

हायड्रोजन हवेच्या संपर्कात आल्यावर अत्यंत ज्वलनशील असतो, ज्यामुळे संभाव्य वापरकर्त्यांना सुरक्षेची चिंता वाटू शकते.

हायड्रोजन गाड्या बनवण्यासाठी क्लिष्ट तंत्रज्ञान आणि विशेष घटकांचा वापर केला जातो. त्यामुळे त्यांचे उत्पादन पारंपरिक पेट्रोल किंवा इलेक्ट्रिक वाहनांच्या तुलनेत अधिक महाग होते. हायड्रोजन कारमधून जरी शून्य उत्सर्जन होत असले, तरी हायड्रोजन उत्पादनात मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधनाचा वापर होतो. यामुळे हरितगृह वायूंचे लक्षणीय उत्सर्जन होते आणि म्हणून हायड्रोजन वायूशी संबंधित पर्यावरणीय परिणामांचा विचार करणे आवश्यक आहे.

त्यामुळे हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्यांची भूमिका मर्यादित राहण्याची शक्यता आहे. पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणाऱ्या गाड्या प्राथमिक वाहतुकीसाठी अव्यवहार्य राहतील. त्याऐवजी प्रमाणित बॅटरीवर चालणाऱ्या ईव्हीचे वर्चस्व राहील. त्यात ईव्ही कारच्या छतावर सोलर पॅनेल्स बसविले, तर ते सूर्यप्रकाशाचे रूपांतर थेट विजेमध्ये करतील. त्याने दिवसाला साधारण १५ ते ३० किलोमीटर इतका अतिरिक्त मायलेज मिळू शकतो.

हायड्रोजन वायूचा वापर रोजच्या प्रवासी गाड्यांऐवजी अवजड वाहतुकीसाठी राखीव ठेवला जाण्याची शक्यता आहे.

आज हायड्रोजन वायूवर चालणाऱ्या गाड्या प्रामुख्याने कॅलिफोर्निया (यूएसए), पूर्व आशिया (जपान, दक्षिण कोरिया, चीन) आणि पश्चिम युरोपच्या काही भागांमध्ये (जर्मनी, फ्रान्स, यूके) चालतात, जिथे हायड्रोजन इंधन भरण्याची प्रस्थापित पायाभूत सुविधा आहे. जपान व दक्षिण कोरिया या देशांत हायड्रोजन कार व हायड्रोजन वायू खरेदीवर मोठ्या प्रमाणात सबसिडी आहे, त्यामुळे तेथील नागरिकांना या गाड्या आर्थिकदृष्ट्या परवडतात.

जागतिक वाहतूक उद्योग मोठ्या प्रमाणावर बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये गुंतवणूक करत आहे. ही वाहने अत्यंत कार्यक्षम असून, त्यांच्यासाठी सार्वजनिक चार्जिंग केंद्रांचे जाळे वेगाने विस्तारत आहे. तसेच, ही वाहने आधीपासून अस्तित्वात असलेल्या विद्युत ग्रिडवर अवलंबून असतात.

प्रयोग म्हणूनच हायड्रोजन कार उत्तम आहे. कंपन्या हायड्रोजन कारऐवजी हायड्रोजन ट्रक्स आणि बसेसवर जास्त भर देत आहेत, कारण मोठ्या इलेक्ट्रिक ट्रक्स व बसेससाठी मोठ्या व जड बॅटऱ्या लागतात. त्यामुळे त्यांची प्रवासी किंवा सामान वाहून नेण्याची क्षमता कमी होते.

पण हायड्रोजन वायू खूप हलका असल्याने ट्रकमध्ये कमी वजनाचे जास्त इंधन साठविता येते. त्यामुळे सध्या वैयक्तिक व छोट्या पल्ल्याच्या वापरासाठी ईव्ही कार हा सर्वोत्तम पर्याय आहे.

सध्या इंधनावरील वाढत्या खर्चाला पर्याय म्हणून व प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा वाढता कल दिसून येतो. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन उद्योग वेगाने विस्तारत असून भारतात २०३० पर्यंत ३ ते ४ कोटी रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे; परंतु भारतात अवजड वाहतूक व लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी हायड्रोजन हे भविष्यातील सर्वात महत्त्वाचे इंधन असणार आहे. हे पण तेवढेच खरे.

प्रा. डॉ. संजय त्रिं. खडक्कार
माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ वैधानिक विकास मंडळ
मो. ७२७६६१४२६०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!