१९६२ मोबाईल वेटरनरी क्लिनिकमुळे पशुपालकांना मोठा दिलासा; वर्षभरात लाखो कॉल्सना प्रतिसाद

'१९६२' हेल्पलाईनद्वारे थेट शेतकऱ्यांच्या दारात पोहोचून उपचार करताना पशुवैद्यकीय पथक; वेळेत मिळालेल्या उपचारांमुळे हजारो पशुधनाचे प्राण वाचण्यास मदत होत आहे.

१९६२ मोबाईल वेटरनरी क्लिनिकमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळाला आहे. जळगावमध्ये वर्षभरात ४ लाखाहून अधिक कॉल्सना प्रतिसाद देत पशुवैद्यकीय सेवा आता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली आहे.

पशुधन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून जनावरांचे आरोग्य बिघडल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडते. मात्र, अद्ययावत तंत्रज्ञान आणि १९६२ मोबाईल वेटरनरी क्लिनिक यांच्या समन्वयामुळे पशुपालकांना मोठा आधार मिळत असून ही सेवा ‘लाईफलाईन’ ठरत आहे.

पशुधन आरोग्याशी संबंधित १९६२ हेल्पलाईनने वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करत ग्रामीण भागातील पशुपालकांना मोठा दिलासा दिला आहे. या कालावधीत एकूण ४,०१,९९२ कॉल्स प्राप्त झाले असून त्यापैकी ३,७८,०३५ पशुधन आरोग्य समस्यांचे यशस्वीरित्या निराकरण करण्यात आले आहे.

दुर्गम व डोंगराळ भागातील ३४,९७९ पशुपालकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. आपत्कालीन परिस्थितीत ‘गोल्डन अवर’मध्ये मदत मिळत असल्याने कॉल आल्यानंतर अवघ्या दीड तासात पशुवैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचते. यामुळे आतापर्यंत ६४,७५९ पशुधनाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे, ज्यात मोठ्या व लहान जनावरांचा समावेश आहे.

पूर्वी किरकोळ आजारांसाठीही पशूंना दवाखान्यात नेणे खर्चिक व वेळखाऊ ठरत होते. मात्र आता तज्ज्ञ पशुवैद्यक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत असल्याने उपचार अधिक सुलभ झाले आहेत. वेळेवर मार्गदर्शन मिळाल्यामुळे संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले असून दुग्धव्यवसाय अधिक शाश्वत व फायदेशीर ठरत आहे.

या हेल्पलाईनद्वारे औषधोपचार, शस्त्रक्रिया, खच्चीकरण, कृत्रिम रेतन, लसीकरण, जंतनाशक उपाययोजना, पशुआहार मार्गदर्शन, वंध्यत्व तपासणी, आपत्कालीन सेवा तसेच शासकीय योजनांची माहिती अशा विविध सेवा दिल्या जात आहेत. तसेच व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारेही माहिती उपलब्ध करून दिली जात आहे.

कॉल सेंटरमध्ये आधुनिक सॉफ्टवेअर, कॉल रेकॉर्डिंग आणि फीडबॅक प्रणालीमुळे सेवेचा दर्जा उंचावला आहे. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सल्ला, डेटा विश्लेषण आणि डिजिटल ट्रॅकिंग प्रणालीचा समावेश करण्याचे नियोजन आहे. यामुळे दुर्गम भागातील सेवा अधिक वेगवान व परिणामकारक होणार असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!