चार दशकांच्या शैक्षणिक सेवेत डॉ. आराधना वैद्य यांनी भारतीय महाविद्यालयाच्या विकासाला दिलेले योगदान, संशोधनाला चालना आणि विद्यार्थ्यांसाठी उभारलेल्या सुविधांचा प्रेरणादायी लेख.
काही व्यक्ती संस्था चालवतात, काही व्यक्ती संस्था घडवतात; तर काही व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने संस्थेच्या इतिहासात स्वतःचा एक स्वतंत्र, संस्मरणीय आणि प्रेरणादायी अध्याय निर्माण करतात. डॉ. आराधना वैद्य हे अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक नाव. पद मिळविणे ही सहज शक्य गोष्ट असते; परंतु पदाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे आणि त्या पदाच्या माध्यमातून असंख्य माणसांच्या जीवनाला स्पर्श करणे, ही मात्र असामान्य कर्तृत्वाची बाब असते. डॉ. आराधना वैद्य यांच्या प्रदीर्घ कार्यप्रवासाकडे पाहताना याची प्रकर्षाने जाणीव होते.
३१ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय महाविद्यालय, अमरावतीच्या प्राचार्यपदावरील त्यांच्या सेवापर्वाची औपचारिक पूर्तता होत आहे. परंतु या क्षणाकडे केवळ एका प्रशासकीय जबाबदारीच्या समाप्तीच्या रूपाने पाहणे योग्य ठरणार नाही. कारण काही पदे संपतात, काही जबाबदाऱ्या बदलतात; पण त्या पदावर काम करताना निर्माण झालेली मूल्ये, संस्कार, आठवणी आणि कर्तृत्वाचा ठसा कधीच संपत नाही. म्हणूनच त्यांच्या सेवापूर्तीचा हा क्षण एका यशस्वी पर्वाचा गौरवशाली समारोप आणि नव्या पर्वाची आश्वासक सुरुवात आहे.
“पूर्तता एका यशस्वी पर्वाची… खुणावती क्षितिजे नवसंकल्पाची…” हे शब्द त्यांच्या सेवापूर्तीच्या निमित्ताने उच्चारताना ते केवळ शुभेच्छांचे शब्द राहत नाहीत, तर त्यांच्या जवळपास चार दशकांच्या कार्यप्रवासाचे सार बनतात.
सन १९८७ पासून भारतीय महाविद्यालयाशी जोडलेली त्यांची नाळ ही नोकरीपुरती मर्यादित नव्हती. एखाद्या संस्थेत काम करणे आणि एखादी संस्था आपल्या आयुष्याचा भाग बनणे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. भारतीय महाविद्यालय हे डॉ. वैद्य यांच्यासाठी केवळ कार्यस्थळ नव्हते; ते त्यांच्या भावविश्वाचा भाग होते. त्यांनी या संस्थेला “माझे माहेर” अशी जी आत्मीय ओळख दिली, त्यातून त्यांच्या आणि संस्थेतील नात्याची खोली स्पष्ट होते.
या चार दशकांच्या प्रवासात त्यांनी अनेक भूमिका निभावल्या. अध्यापन केले, प्रशासन केले, निर्णय घेतले, आव्हानांना सामोरे गेले, संस्थेच्या विकासासाठी प्रयत्न केले, विद्यार्थ्यांना घडविले आणि सहकाऱ्यांना पुढे जाण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली. मात्र, या सर्व भूमिकांमध्ये एक गोष्ट कायम राहिली, माणसांशी असलेला जिव्हाळा.
मोठे पद मिळाल्यानंतर माणूस स्वतःभोवती एक अदृश्य भिंत उभी करतो, असे अनेकदा दिसून येते. परंतु डॉ. आराधना वैद्य यांच्या बाबतीत नेमके याच्या उलट चित्र दिसते. प्राचार्यपदाची जबाबदारी, व्यवस्थापनातील विविध भूमिका आणि विद्यापीठीय स्तरावरील नेतृत्व यामुळे त्यांची उंची वाढत गेली; पण त्या उंचीने त्यांना जमिनीपासून कधीच दूर केले नाही. अधिकार हातात असूनही अहंकार मनात आला नाही. निर्णयक्षमता असूनही संवादाची दारे बंद झाली नाहीत. शिस्तीचा आग्रह असूनही माणुसकी हरवली नाही.
याच गुणामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या अनेक सहकाऱ्यांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली. एखाद्या व्यक्तीच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे, त्याला प्रोत्साहन देणे आणि योग्य वेळी त्याच्या पाठीशी उभे राहणे हा नेतृत्वाचा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. डॉ. वैद्य यांच्या व्यक्तिमत्त्वात हा गुण प्रकर्षाने जाणवतो. त्यांच्या नेतृत्वाचा अनुभव घेताना मला वारंवार जाणवले की, “खरा नेता स्वतः किती पुढे गेला यापेक्षा त्याने आपल्या सोबत किती माणसांना पुढे नेले, यावर त्याचे मोठेपण ठरते.”
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक भावस्पर्शी पैलू म्हणजे डॉ. आराधना वैद्य, अलका गायकवाड मॅडम आणि दवंडे मॅडम या त्रिकूटाची ३५-४० वर्षांची मैत्री. आजच्या वेगवान, स्पर्धात्मक आणि अनेकदा स्वार्थकेंद्री वातावरणात एवढ्या प्रदीर्घ काळाची मैत्री टिकणे हीच एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. काळ बदलला, जबाबदाऱ्या बदलल्या, पदे बदलली; पण मैत्रीतील विश्वास, जिव्हाळा आणि आपलेपणा कायम राहिला. मैत्री कशी असावी, ती कोणाशी करावी आणि आयुष्याच्या विविध वळणांवर ती कशी जपावी, याचा जिवंत आदर्श या मैत्रीतून पाहायला मिळतो. माणसाच्या आयुष्यातील खरी संपत्ती त्याच्या पदांमध्ये किंवा अधिकारांमध्ये नसते; ती त्याने जपलेल्या नात्यांमध्ये असते. डॉ. वैद्य यांच्या व्यक्तिमत्त्वातील ही भावनिक श्रीमंती त्यांच्या प्रशासकीय कर्तृत्वाइतकीच महत्त्वाची आहे.
प्राचार्य म्हणून गेल्या दशकातील त्यांचे नेतृत्व पाहिले तर भारतीय महाविद्यालयाच्या चेहऱ्यामोहर्यात झालेला बदल स्पष्टपणे जाणवतो. सुसज्ज ग्रंथालय, वातानुकूलित ऑडिटोरियम, स्टाफ रूम, विविध विभागांसाठी आवश्यक सुविधा, संशोधन प्रयोगशाळा, कॅम्पसचे सौंदर्यीकरण, ४० किलोवॅट क्षमतेची सौरऊर्जा व्यवस्था आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या उपक्रमांतून त्यांनी आधुनिकतेसोबतच शाश्वत विकासाची संकल्पना प्रत्यक्षात आणली.
परंतु त्यांना संस्थेचा विकास म्हणजे केवळ इमारती उभारणे असे कधीच वाटले नाही. त्यांच्या दृष्टीने संस्थेची खरी ओळख तिच्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांत, शिक्षकांच्या ज्ञानात आणि परिसरातील शैक्षणिक वातावरणात असते.
याच विचारातून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वातानुकूलित अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा केंद्र उभारण्यात आले. सुमारे ११० विद्यार्थ्यांना एकाच वेळी अभ्यास करता येईल अशी सुविधा निर्माण झाली. माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने सुमारे १९ लाख रुपयांचा निधी उभारण्यात आला. CRPF, न्यायालयीन स्टेनोग्राफर आणि क्लार्क पदांवर विद्यार्थ्यांची झालेली निवड ही या उपक्रमाची प्रत्यक्ष फलश्रुती आहे. विद्यार्थ्यांच्या हातात फक्त पदवी देण्यापेक्षा त्यांच्या स्वप्नांना दिशा देणे आणि त्यांना स्पर्धेच्या जगात उभे राहण्याची क्षमता देणे, हा त्यांच्या नेतृत्वाचा केंद्रबिंदू राहिला.
त्याचप्रमाणे संशोधन संस्कृती निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्नही विशेष उल्लेखनीय आहेत. विविध विभागांत नऊ संशोधन केंद्रांची स्थापना, प्राध्यापकांनी संशोधन लेखन करावे, पुस्तके लिहावीत, मान्यताप्राप्त नियतकालिकांमध्ये प्रकाशित व्हावे आणि महाविद्यालयाची शैक्षणिक प्रतिष्ठा वाढावी, यासाठी त्यांनी दिलेले प्रोत्साहन या सर्वांमधून त्यांच्या शैक्षणिक दूरदृष्टीची प्रचिती येते. त्यामुळे त्यांचा प्रश्न केवळ “महाविद्यालय कसे चालवायचे?” असा नव्हता; तर त्यांचा मूलभूत प्रश्न होता, “महाविद्यालय कसे घडवायचे?” 
हीच संस्थानिर्मितीची दृष्टी आहे.
या वातावरणाचा परिणाम विविध विभागांच्या कार्यावर झाला. माझ्या स्वतःच्या शैक्षणिक प्रवासातही त्यांचे मार्गदर्शन आणि संस्थात्मक पाठबळ महत्त्वाचे ठरले. २०१९-२० मध्ये भारतीय महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयासाठी रुजू झाल्यानंतर विभागाला शैक्षणिक, संशोधनात्मक आणि सामाजिक क्षेत्रात व्यापक दिशा देण्याची संधी मिळाली. पीएच.डी. संशोधन, राष्ट्रीय व राज्यस्तरीय परिषदा, ऑनलाइन शैक्षणिक उपक्रम, NET/SET यश, संशोधन पुरस्कार आणि विविध शैक्षणिक सन्मानांच्या प्रवासात संस्थेने दिलेले वातावरण आणि प्रोत्साहन निश्चितच महत्त्वाचे ठरले. या यशात वैयक्तिक प्रयत्नांसोबत संस्थात्मक नेतृत्वाचा वाटाही तितकाच महत्त्वाचा असतो.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले. स्वच्छता अभियान, सामाजिक उपक्रम, आपत्ती व्यवस्थापन, राष्ट्रीय कार्यक्रम आणि विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकासाच्या विविध उपक्रमांना त्यांनी प्रोत्साहन दिले. उत्कृष्ट स्वयंसेवक, स्वयंसेविका, उत्कृष्ट युनिट आणि कार्यक्रमाधिकारी यांना मिळालेले पुरस्कार हे त्या कार्याची पावती आहेत. समाजाशी जोडलेले शिक्षण हीच शिक्षणाची खरी ताकद आहे, यावर त्यांचा विश्वास होता.
त्यांच्या नेतृत्वाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाजू म्हणजे शिस्त. सकाळी आठ वाजल्यापासून महाविद्यालयात उपस्थित राहणे, नियमित अध्यापन करणे, वेळेचे काटेकोर पालन करणे आणि इतरांकडून अपेक्षा करण्यापूर्वी स्वतः त्या अपेक्षांचे पालन करणे, ही त्यांची कार्यपद्धती होती. “मी प्राचार्य आहे म्हणून मला उशिरा येण्याचा अधिकार आहे,” ही मानसिकता त्यांनी कधीही स्वीकारली नाही. नेतृत्वाची सुरुवात स्वतःपासून होते, याचे त्यांनी कृतीतून उदाहरण घालून दिले.
मात्र या शिस्तीच्या कठोर चौकटीमागे एक अत्यंत संवेदनशील आणि मायेचे मन होते. शिक्षकांच्या, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणे, त्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि प्रत्येकाला संस्थेच्या कुटुंबाचा भाग समजणे, ही त्यांची मानवी बाजू होती. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कठोर शिस्त आणि कोमल संवेदना, अधिकार आणि आपलेपणा, निर्णयक्षमता आणि माणुसकी यांचा विलक्षण समन्वय दिसतो.
डॉ. आराधना वैद्य यांचे नेतृत्व महाविद्यालयाच्या चौकटीतही थांबले नाही. विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक प्रक्रियांमध्ये सहभाग, इंग्रजी अभ्यास मंडळातील काम आणि २०२२ मध्ये प्राचार्य प्रवर्गातून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभेवर मोठ्या मताधिक्याने निवडून येणे, या माध्यमातून त्यांनी व्यापक शैक्षणिक नेतृत्वाची क्षमता सिद्ध केली.
आता ३१ ऑगस्ट २०२६ नंतर भारतीय महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची जबाबदारी संपणार असली, तरी त्यांच्या कार्याचा प्रवास थांबणार नाही. विद्यामंदिरच्या अध्यक्षपदाची नवी जबाबदारी त्यांच्या अनुभवाला अधिक व्यापक व्यासपीठ देणारी आहे. भारतीय महाविद्यालयात चार दशकांच्या अनुभवातून त्यांनी जे शिकले, जे उभारले आणि जे घडविले, त्याचा लाभ आता व्यापक शैक्षणिक परिवाराला मिळणार आहे.
त्यामुळे ही सेवापूर्ती म्हणजे शेवट नव्हे. ही एका नव्या पर्वाची सुरुवात आहे.
१९८७ ते २०२६ हा काळ म्हणजे जवळपास चार दशकांचा प्रवास आहे. या काळात असंख्य विद्यार्थी घडले, शिक्षकांना प्रेरणा मिळाली, संशोधनाला चालना मिळाली, संस्थेचा भौतिक आणि शैक्षणिक विकास झाला आणि अनेकांच्या जीवनाला दिशा मिळाली. म्हणून डॉ. आराधना वैद्य यांना केवळ “सेवानिवृत्त होणाऱ्या प्राचार्या” या चौकटीत पाहणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर अन्याय करणारे ठरेल.
त्या शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्या संस्थानिर्मात्या आहेत. त्या सक्षम प्रशासक आहेत. त्या संशोधनाला प्रोत्साहन देणाऱ्या नेतृत्वकर्त्या आहेत. त्या माणसं जोडणाऱ्या सहकारी आहेत. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्या एक संवेदनशील, जमिनीशी जोडलेले आणि आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत.
पद निवृत्त होते; व्यक्तिमत्त्व निवृत्त होत नाही.
सेवा संपते; संस्कार संपत नाहीत.
जबाबदारी बदलते; कर्तृत्वाचा ठसा पुसला जात नाही.
एक अध्याय पूर्ण होतो; पण प्रेरणेची कथा पुढे सुरूच राहते.
भारतीय महाविद्यालयाच्या इतिहासात डॉ. आराधना वैद्य यांचे नाव शिस्त, समर्पण, माणुसकी, दूरदृष्टी आणि संस्थानिर्मितीच्या एका उज्ज्वल पर्वाचे प्रतीक म्हणून कायम स्मरणात राहील.
आज त्यांच्या सेवापूर्तीच्या या भावनिक क्षणी मनात एकच भावना उमटते,
“पूर्तता एका यशस्वी पर्वाची…
खुणावती क्षितिजे नवसंकल्पाची…!”
त्यांच्या सेवापर्वाला मनःपूर्वक सलाम आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
आता नव्या जबाबदारीतून त्यांच्या अनुभवाला नवी दिशा मिळो, विद्यामंदिरच्या शैक्षणिक परिवाराला त्यांच्या नेतृत्वाचा लाभ मिळो, नव्या पिढीच्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना त्यांच्या दूरदृष्टीची साथ मिळो आणि शिक्षणाच्या क्षेत्रात आणखी अनेक नवे आदर्श निर्माण होवोत, हीच मनःपूर्वक सदिच्छा.
प्रा. डॉ. प्रशांत विघे
राज्यशास्त्र विभाग प्रमुख, भारतीय महाविद्यालय, अमरावती
तथा सिनेट सदस्य, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती

प्रा. डॉ. प्रशांत विघे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील माहिती आणि लेख उपलब्ध करून देतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष लेखणीच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. आपल्या लेखणीच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी लेख प्रकाशित करतात.
मो. क्र. -९३२६८७७७४९
