लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या विचारांचा वारसा, स्वदेशी आंदोलन, केसरी वृत्तपत्र आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ऐतिहासिक योगदानावर आधारित विशेष संपादकीय लेख.
१ ऑगस्ट म्हटले की शाळा व महाविद्यालयांमध्ये लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोठमोठ्या वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जात असत. मला अजूनही माझ्या शाळेतील त्या वक्तृत्व स्पर्धा आठवतात. त्यांची सुरुवात साधारणपणे अशा प्रकारे व्हायची—
“मंचावर उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक, गुरुजनवर्ग आणि उपस्थित माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावी, ही सर्वांना विनंती.”
अशा प्रकारच्या वक्तृत्व स्पर्धा शाळांमध्ये होत असत. पण खरंच आपण लोकमान्य टिळकांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आहोत का? त्यांनी केलेला संघर्ष, त्याग आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान आपल्याला माहिती आहे. मात्र, त्यांच्या कर्तृत्वाची, संघर्षाची आणि नेतृत्वाची महती आज हळूहळू विस्मृतीत जात आहे. म्हणूनच आज लोकमान्य टिळकांना नव्याने समजून घेण्याची गरज आहे.
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,” अशी सिंहगर्जना करून देशातील जनतेला ब्रिटिशांच्या विरोधात उभे राहण्याची प्रेरणा देणाऱ्या लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी झाला. स्वदेशी वस्तूंचा वापर, परदेशी वस्तूंवर बहिष्कार आणि ब्रिटिशांविरोधातील आंदोलनांना त्यांनी नवे बळ दिले. राष्ट्रीय एकात्मतेसाठी शिक्षण अत्यावश्यक असल्याचे मानून त्यांनी स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली.
शालेय शिक्षण सर्वसामान्यांना परवडावे या उद्देशाने त्यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. त्यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. १८८१ मध्ये त्यांनी केसरी (मराठी) आणि मराठा (इंग्रजी) ही वृत्तपत्रे सुरू केली. सार्वजनिक गणेशोत्सवाला लोकचळवळीचे स्वरूप देत समाजाला एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सार्वजनिक स्वरूपात साजरी करून राष्ट्रीय अस्मिता जागविण्याचे काम त्यांनी केले.
त्यांचा हेतू एकच होता—देशाला शक्य तितक्या लवकर स्वातंत्र्य मिळावे. याच ध्येयाने ते अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहिले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ‘लाल-बाल-पाल’ या त्रिकुटामध्ये लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांचा समावेश होता. या त्रिकुटाने ब्रिटिश सत्तेविरुद्ध जहाल राष्ट्रवादाची चळवळ उभी केली.
ब्रिटिशांच्या विरोधात निर्भीडपणे भूमिका मांडणारे आणि लोकांना संघटित करणारे नेतृत्व म्हणजे लोकमान्य टिळक. आपल्या केसरी वृत्तपत्रातून त्यांनी ब्रिटिश सरकारवर कठोर टीका केली. “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?” हा त्यांचा अग्रलेख त्या काळात प्रचंड गाजला. स्वातंत्र्यासाठी त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध सातत्याने संघर्ष केला. परिणामी, त्यांच्यावर दोन वेळा राजद्रोहाचे आरोप ठेवण्यात आले आणि त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.
महात्मा गांधी राष्ट्रीय राजकारणात येण्यापूर्वी देशातील सर्वाधिक प्रभावशाली राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून लोकमान्य टिळकांची ओळख होती. त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. त्यातील सर्वाधिक प्रसिद्ध तुरुंगवास ब्रह्मदेशातील (आताचे म्यानमार) मंडाले कारागृहात झाला. तेथेच त्यांनी गीतारहस्य हा अमूल्य ग्रंथ लिहिला.
ब्रिटिश लेखक सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी त्यांना “भारतीय असंतोषाचे जनक” असे संबोधले होते. स्वराज्य प्राप्ती हेच प्रत्येक भारतीयाचे सर्वोच्च ध्येय असावे, असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांनी आपल्या लेखनातून, पत्रकारितेतून आणि सार्वजनिक कार्यातून जनतेमध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित केली.
लोकमान्य टिळक हे केवळ स्वातंत्र्यसैनिक नव्हते, तर ते एक उत्तम लेखक, पत्रकार, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजप्रबोधक होते. समाजातील अनेक अनिष्ट रूढी-परंपरांवर त्यांनी परखडपणे टीका केली आणि समाजजागृतीचे कार्य केले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील जहाल राष्ट्रवादी नेतृत्व म्हणून त्यांना जनतेने “लोकमान्य” ही पदवी बहाल केली. महात्मा गांधींनीही त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना आधुनिक भारताच्या निर्मितीतील अग्रणी व्यक्तिमत्त्व मानले.
अशा या थोर राष्ट्रपुरुषांचे १ ऑगस्ट १९२० रोजी निधन झाले. त्यांच्या विचारांचा, राष्ट्रनिष्ठेचा आणि स्वराज्याच्या अखंड ध्यासाचा वारसा आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारा आहे.
या महान युगपुरुषाच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!

प्रा. डॉ. प्रसन्न देशमुख हे प्राध्यापक, संशोधक आणि लेखक असून त्यांना अध्यापन व संशोधन क्षेत्रातील १५ वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, पर्यावरणीय, कृषी आणि समकालीन विषयांवर ते संशोधनाधारित व विश्लेषणात्मक लेखन करतात. स्थानिक समाचार डिजिटल मीडियासाठी ते विविध सार्वजनिक महत्त्वाच्या विषयांवर अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित करून वाचकांना विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करून देतात.
Mo. no. 7038224819, Email- psdeshmukh17@gmail.com
