विद्यानिकेतनमध्ये पार पडलेल्या सिडबॉल मेकिंग कार्यशाळेत पर्यावरण संरक्षण, वृक्षलागवड आणि लोकसहभागातून हरित महाराष्ट्र उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि लोकसहभागातून हरित महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने विद्यानिकेतन माजी विद्यार्थी महासंघ आणि फ्रेंड्स ऑफ रेप्टाईल्स अँड एन्व्हायरमेंटल सेविंग ट्रस्ट (FOREST) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार पेठ येथील विद्यानिकेतनमध्ये ‘सिडबॉल मेकिंग वर्कशॉप’ मोठ्या उत्साहात पार पडले. दहा लाख सिडबॉल्स तयार करण्याच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेला विद्यानिकेतनच्या आजी-माजी विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक आणि पर्यावरणप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपक्रमाला मोलाचा हातभार लावला.
कार्यशाळेची सुरुवात पर्यावरण संवर्धनाच्या संदेशाने झाली. “एका छोट्याशा बीजात विशाल जंगल दडलेले असते,” या प्रेरणादायी विचारातून प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण रक्षणासाठी आपला सहभाग नोंदवावा, असा संदेश उपस्थितांना देण्यात आला.
यावेळी FOREST संस्थेचे सागर बावळे यांनी जंगलतोड, हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास आणि वाढते प्रदूषण यामुळे पर्यावरणासमोर निर्माण झालेल्या गंभीर आव्हानांवर प्रकाश टाकला. त्यांनी सिडबॉल्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड आणि नैसर्गिक वननिर्मिती शक्य असल्याचे सांगत या संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यशाळेत स्वयंसेवक चेतन निगडे, बसवराज बनसोडे, भास्कर भालेराव, अनिकेत जाधव आणि पीयूष देवकाते यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे सिडबॉल्स तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. देशी वृक्षांच्या बियांची निवड, योग्य माती, सेंद्रिय खत, नैसर्गिक कीटकनाशक आणि रुजण्यासाठी आवश्यक मिश्रण वापरून बीजगोळे कसे तयार करावेत, याचे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेतील सर्वात आकर्षक बाब म्हणजे विद्यार्थ्यांचा उत्साह. लहान मुलांनी चिखलात हात माखवत आनंदाने सिडबॉल्स तयार केले, तर आजी-माजी विद्यार्थी आणि पालकांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. सिडबॉल्स तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून शालेय विद्यार्थी घरच्या घरीही अशा बीजगोळ्यांची निर्मिती करून परिसरात हिरवाई वाढवू शकतात, असा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन आणि संयोजन विद्यानिकेतन माजी विद्यार्थी महासंघाचे मुख्य कार्यवाहक समीर दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यामध्ये हर्षद छल्लारे, कल्पना मोरे, समीर मुलानी यांनी सक्रिय भूमिका बजावत उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यानिकेतन क्र. १ च्या मुख्याध्यापिका वीणा नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ज्येष्ठ मार्गदर्शक विष्णू सुर्वे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली, तर जयवंत बोरसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
आयोजकांनी सांगितले की, FOREST संस्थेच्या माध्यमातून यावर्षी दहा लाख सिडबॉल्स तयार करून राज्यातील विविध भागांत त्यांचे वितरण व विसर्जन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवकांना जोडून व्यापक लोकसहभाग निर्माण केला जाणार आहे.
या उपक्रमातून केवळ वृक्षलागवड नव्हे, तर पर्यावरण संरक्षणाची सामाजिक जाणीव निर्माण करणे, तरुण पिढीला निसर्गाशी जोडणे आणि ‘हरित महाराष्ट्र’ घडविण्यासाठी सामूहिक चळवळ उभी करणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. आगामी काळात अशा सिडबॉल मेकिंग कार्यशाळा राज्यातील विविध शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांमध्ये आयोजित करण्यात येणार असून अधिकाधिक नागरिकांनी या हरित अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
