जळगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; पिरजादे वाडा परिसरातून ८० किलो गोमांस जप्त. महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने शनिवारी सकाळी जळगाव शहरातील पिरजादे वाडा परिसरात धाड टाकून ८० किलो गोमांसासह चार जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत गोमांस, मांस कापण्याची हत्यारे आणि वजनकाटा असा एकूण १६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांना १ ऑगस्ट रोजी सकाळी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, जामा मशिदीसमोरील पत्र्याच्या शेडमध्ये गोमांसाची विक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना देण्यात आल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार पंचांसह पोलीस पथकाने घटनास्थळी छापा टाकला.
कारवाईदरम्यान युसुफ खान इस्माईल खान (५२, रा. लक्ष्मीनगर, दत्तनगर, मेहरूण), शफी शेख बाबुलाल कुरेशी (५२, रा. तांबापुरा, शावलीया मशिदीजवळ), मुख्तार शेख बिस्मिल्ला (४२, रा. तांबापुरा, बिस्मिल्ला चौक) आणि शेख रईस शेख मुनाफ (४०, रा. नवी कॉलनी, पाळधी, ता. धरणगाव) हे गोवंशाची कत्तल करून गोमांस विक्री करताना आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
छाप्यात ८० किलो वजनाचे कत्तल केलेले गोमांस, सहा लोखंडी सुरे, एक कुऱ्हाड आणि एक वजनकाटा असा एकूण १६,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस अंमलदार अफजल रफिउद्दीन बागवान यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६३६/२०२६ अन्वये महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील कलम ५(क) व ९(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक महाजन करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
