प्रभाग क्रमांक २ मध्ये महिलांना उद्योग व स्वयंरोजगाराच्या योजनांची माहिती; विविध योजनांबाबत उपस्थित महिलांनी प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले.
विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने हरिभाऊ नगर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, प्रभाग क्रमांक २ येथे जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उद्योग व स्वयंरोजगार योजनांची जनजागृती करण्यात आली.
राज्याचे माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ट्वेंटीवन ॲग्री लि.च्या संचालिका सौ. अदितीताई अमित देशमुख यांच्या पुढाकारातून हा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना कौशल्यावर आधारित विविध प्रशिक्षण दिले जात असून, या प्रशिक्षणासोबतच महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी आणि स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी लक्ष्मीकांत कैले, व्यवसाय सुविधा केंद्राचे आदित्य देशमुख आणि तांत्रिक व्यवस्थापक व फिल्ड ऑफिसर प्रतीक देशमुख यांनी उपस्थित महिलांना शासनाच्या विविध उद्योग व स्वयंरोजगार योजनांची माहिती दिली.
प्रतीक देशमुख यांनी उद्योग सुरू करण्यासाठी उपलब्ध अनुदान व कर्ज योजना, प्रशिक्षण, मार्गदर्शन, आवश्यक कागदपत्रे तसेच व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच महिलांसाठी उपलब्ध असलेल्या उद्योजकता विकासाच्या संधींबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागांतर्गत उद्योजकता विकासासाठी विविध प्रशिक्षण उपक्रम राबविले जातात.
सायबर सुरक्षेबाबतही जनजागृती
या कार्यक्रमादरम्यान राजर्षी शाहू महाविद्यालयातील विद्यार्थी आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा जनजागृती करण्यात आली. साहिल जाधव आणि कार्तिक मोतीपवळे यांनी सायबर गुन्हेगारी, OTP फसवणूक आणि डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी याबाबत उपस्थितांना माहिती दिली.
अनधिकृत व्यक्तींना OTP, पासवर्ड किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये तसेच ऑनलाइन व्यवहार करताना आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमास विलासराव देशमुख फाउंडेशन स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या विभाग प्रमुख श्रीमती संगीता मोळवणे, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख प्रवीण सूर्यवंशी, रोहिणी शिंदे, फाउंडेशनचे समन्वयक गजानन बोयणे, सोशल प्लॅनर सोमनाथ कावळे, आशिष सदाकाळे आणि वैभव कांबळे यांच्यासह हरिभाऊ नगर व प्रभाग क्रमांक २ परिसरातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित महिलांनी विविध योजनांबाबत प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या जनजागृती कार्यक्रमामुळे उद्योग व स्वयंरोजगाराशी संबंधित योजनांची माहिती अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. कार्यक्रमाचे आभार पल्लवी परसबोने यांनी मानले.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
