लातूरच्या जय भारत विद्यालयात बाराशेहून अधिक विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम; प्राचार्य मनोज सर यांनी नियमित सायबर सुरक्षा चर्चेचे आवाहन केले.
जय भारत विद्यालय येथे क्विक हील फाउंडेशनच्या वतीने बाराशेहून अधिक विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सायबर सुरक्षा तज्ज्ञ साहिल जाधव यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सायबर फसवणुकीबाबत मार्गदर्शन केले. तसेच प्रत्यक्ष हॅकिंगचे प्रात्यक्षिक दाखवून सायबर गुन्हे कोणत्या पद्धतीने घडू शकतात, याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
या प्रात्यक्षिकादरम्यान अनोळखी लिंक, ओटीपी, संकेतशब्द, सोशल मीडिया आणि ऑनलाइन व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. डिजिटल व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे, संशयास्पद लिंकवर क्लिक न करणे तसेच वैयक्तिक माहिती कोणासोबतही शेअर न करणे याचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले.
कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून सायबर सुरक्षेबाबत अधिक माहिती जाणून घेतली. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकामुळे सायबर गुन्ह्यांची कार्यपद्धती आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजना विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे समजल्या.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य मनोज सर, सर्व शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. प्राचार्य मनोज सर यांनी साहिल जाधव यांच्या सायबर सुरक्षा जनजागृतीच्या कार्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत सातत्याने जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी प्रत्येक वर्गात दर शनिवारी किंवा रविवारी सायबर सुरक्षेच्या विषयावर चर्चा घडवून आणावी, असे आवाहन त्यांनी शिक्षक व कर्मचाऱ्यांना केले.
विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत अशाच प्रकारे प्रत्यक्ष आणि प्रभावी मार्गदर्शन मिळावे, यासाठी भविष्यातही साहिल जाधव यांना विद्यालयात आणखी मोठे जनजागृती कार्यक्रम घेण्यासाठी निमंत्रित करण्यात येईल, असे प्राचार्य मनोज सर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित डिजिटल भविष्यासाठी सायबर सुरक्षा जनजागृतीचे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
