दिवाळी-छटसाठी विशेष रेल्वेगाड्यांची गर्दी; जळगाव-भुसावळमार्गे शेकडो फेऱ्या; मुंबई, पुणे, नागपूरसह उत्तर भारतातील प्रमुख शहरांशी संपर्क; जळगाव-भुसावळला अनेक गाड्यांना थांबे

दिवाळी आणि छट सणाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून विविध मार्गांवर विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. मुंबई, पुणे, नागपूरसह उत्तर भारतातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या अनेक विशेष गाड्यांना जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

विशेष रेल्वे गाड्यांचे आरक्षण २७ आणि २८ सप्टेंबरपासून सुरू होणार. प्रवाशांना आरक्षण केंद्रांसह आयआरसीटीसी संकेतस्थळ आणि रेल्वे ॲपवरून तिकीट बुक करता येणार.

 दिवाळी आणि छट सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विविध मार्गांवर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह गोरखपूर, मऊ, गाझीपूर आणि बनारस या प्रमुख शहरांना जोडणाऱ्या विशेष गाड्यांचा प्रवाशांना लाभ होणार आहे. यातील अनेक गाड्यांना जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनस–मऊ विशेष गाडी

लोकमान्य टिळक टर्मिनस–मऊ–लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक ०११२३/०११२४च्या २४ फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक ०११२३ लोकमान्य टिळक टर्मिनसहून ११ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबरदरम्यान शुक्रवारी आणि रविवारी दुपारी १२.१५ वाजता सुटेल. परतीची गाडी क्रमांक ०११२४ मऊहून १३ ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबरदरम्यान रविवार आणि मंगळवारी पहाटे ४.१५ वाजता सुटेल. या गाडीला जळगाव आणि भुसावळ येथे थांबे असतील.

हडपसर–गाझीपूर सिटी विशेष गाडी

हडपसर–गाझीपूर सिटी–हडपसर द्वि-साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक ०१४३१/०१४३२च्या २४ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. हडपसरहून ही गाडी सकाळी ६.५५ वाजता, तर गाझीपूर सिटीहून पहाटे ४ वाजता सुटेल. या गाडीचेही जळगाव आणि भुसावळ येथे थांबे असतील.

नागपूर–हडपसर सुपरफास्ट विशेष गाड्या

नागपूर–हडपसर–नागपूर द्वि-साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी क्रमांक ०१२०१/०१२०२च्या २६ फेऱ्या नियोजित आहेत. हडपसरहून मंगळवार आणि शुक्रवारी दुपारी ४.०५ वाजता, तर नागपूरहून सोमवार आणि गुरुवारी सायंकाळी ७.४० वाजता गाडी सुटेल. या गाडीला जळगाव आणि भुसावळ येथे थांबे राहतील.

याशिवाय नागपूर–हडपसर–नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी क्रमांक ०१२०९/०१२१०च्या १४ फेऱ्याही होणार आहेत.

मुंबई–गोरखपूर विशेष गाडीच्या ६४ फेऱ्या

मुंबई सीएसएमटी–गोरखपूर–मुंबई सीएसएमटी विशेष गाडी क्रमांक ०१०७९/०१०८०च्या तब्बल ६४ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. सीएसएमटीहून ही गाडी दररोज रात्री १०.३० वाजता, तर गोरखपूरहून दररोज दुपारी २.३० वाजता सुटेल. जळगाव आणि भुसावळ येथे या गाडीला थांबे असतील.

मुंबई–नागपूर, हडपसर–गोरखपूर गाड्यांचाही समावेश

मुंबई सीएसएमटी–नागपूर–मुंबई सीएसएमटी साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी क्रमांक ०२१३९/०२१४०च्या १२ फेऱ्या होतील. या गाडीला जळगाव आणि भुसावळ येथे थांबे देण्यात आले आहेत.

हडपसर–गोरखपूर–हडपसर दैनिक विशेष गाडी क्रमांक ०१४१५/०१४१६च्या ६४ फेऱ्या होणार असून, भुसावळ येथे या गाडीला थांबा असेल.

अमरावती–पुणे विशेष गाडी

नवी अमरावती–पुणे–नवी अमरावती साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक ०१४०४/०१४०३च्या १२ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. भुसावळ, जळगाव आणि चाळीसगाव येथे या गाडीला थांबे असतील.

तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस–बनारस–लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक ०१०५१/०१०५२च्या २४ फेऱ्या होणार असून, जळगाव आणि भुसावळ येथे या गाडीला थांबे असतील.

२७ सप्टेंबरपासून आरक्षण

विशेष गाडी क्रमांक ०११२३, ०१४३१, ०१२०१, ०१२०२ आणि ०१०७९ यांचे आरक्षण २७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

तर ०१२०९, ०१२१०, ०२१३९, ०२१४०, ०१४१५, ०१४०३, ०१४०४ आणि ०१०५१ या विशेष गाड्यांचे आरक्षण २८ सप्टेंबरपासून सुरू होईल.

प्रवाशांना सर्व आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसी संकेतस्थळावर तिकीट आरक्षित करता येणार असून, रेल्वेच्या मोबाईल ॲपद्वारेही आरक्षणाची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!