भारत विकास परिषदेच्या राष्ट्रीय समूहगान स्पर्धेत ओरियन सीबीएसई स्कूल विजेता; ब. गो. शानबाग विद्यालय उपविजेते; ‘भारत को जानो’ प्रश्नमंजुषेतही विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

जळगावमध्ये भारत विकास परिषदेतर्फे आयोजित राष्ट्रीय समूहगान स्पर्धेत ओरियन सीबीएसई स्कूलने विजेतेपद पटकावले. स्पर्धेत २५ शाळांनी सहभाग घेतला.

ओरियन सीबीएसई स्कूलने हिंदी, संस्कृत आणि लोकगीत समूहगानात उल्लेखनीय यश मिळवले; ‘भारत को जानो’ प्रश्नमंजुषेतही विविध शाळांची चमकदार कामगिरी.

भारत विकास परिषद, जळगाव शाखेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय समूहगान स्पर्धेत ओरियन सीबीएसई स्कूलच्या संघाने विजेतेपद, तर ब. गो. शानबाग विद्यालयाच्या संघाने उपविजेतेपद पटकावले. रिंगरोडवरील महेश प्रगती मंडळाच्या सभागृहात ‘भारत को जानो’ प्रश्नमंजुषा आणि राष्ट्रीय समूहगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख आणि जळगाव जनता सहकारी बँकेचे संचालक मधुकर पाटील यांच्या उपस्थितीत झाले. शहरातील २५ शाळांच्या संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. राष्ट्रीय समूहगान स्पर्धेचे परीक्षण मोहन रावतोळे, शिरीष जोशी आणि सारंग जेऊरकर यांनी केले.

पारितोषिक वितरण जळगाव पीपल्स बँकेचे चेअरमन व उद्योजक अनिकेत पाटील आणि प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

‘भारत को जानो’ प्रश्नमंजुषेतही विद्यार्थ्यांचे यश

‘भारत को जानो’ प्रश्नमंजुषेच्या कनिष्ठ गटात विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, वाघनगरने प्रथम क्रमांक पटकावला. ब. गो. शानबाग विद्यालयाने द्वितीय, काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलने तृतीय तर ओरियन इंग्लिश मीडियम स्कूलने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.

वरिष्ठ गटात इम्पेरियल इंटरनॅशनल स्कूलने प्रथम, एस. एन. चौधरी विद्यालयाने द्वितीय, ला. ना. सार्वजनिक विद्यालयाने तृतीय तर स. ना. झंवर, पाळधी यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.

हिंदी, संस्कृत आणि लोकगीतांमध्ये ओरियन सीबीएसईचे वर्चस्व

राष्ट्रीय समूहगान स्पर्धेतील हिंदी गीताच्या गटात ओरियन सीबीएसई स्कूलने प्रथम क्रमांक मिळविला. ब. गो. शानबाग विद्यालयाने द्वितीय तर ओरियन इंग्लिश मीडियम स्कूलने तृतीय क्रमांक पटकावला.

संस्कृत गीताच्या गटातही ओरियन सीबीएसई स्कूलने प्रथम क्रमांक मिळविला. ब. गो. शानबाग विद्यालयाने द्वितीय तर इम्पेरियल इंटरनॅशनल स्कूलने तृतीय क्रमांक मिळविला.

लोकगीताच्या गटात ओरियन सीबीएसई स्कूलने प्रथम क्रमांक मिळविला. ब. गो. शानबाग विद्यालयाने द्वितीय तर इम्पेरियल इंटरनॅशनल स्कूलने तृतीय क्रमांक पटकावला.

पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख व संयोजक जान्हवी खाडिलकर यांनी केले. सूत्रसंचालन श्याम दायमा आणि अलका जडीये यांनी केले. यावेळी भारत विकास परिषदेचे तुषार तोतला, विशाल चोरडिया, अध्यक्ष अनिरुद्ध कोटस्थाने आणि सचिव भूषण गुरव यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी भारत विकास परिषदेचे पदाधिकारी, सदस्य तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!