देशातील प्रतिभावान बालकांचा गौरव करणाऱ्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 साठी अर्ज मागविण्यात आले आहेत. स्व-नामांकन आणि तृतीय पक्ष नामांकनाला मान्यता.
महिला आणि बाल विकास मंत्रालयाने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (PMRBP) 2026 साठी ऑनलाइन नामांकन प्रक्रिया सुरू केली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी https://awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन मंत्रालयाने केले आहे.
भारतामध्ये वास्तव्यास असलेले भारतीय नागरिक आणि 31 जुलै 2026 रोजी 5 ते 18 वर्षे वयोगटातील बालके या पुरस्कारासाठी पात्र आहेत. स्व-नामांकन तसेच तृतीय पक्षाकडून शिफारस अशा दोन्ही प्रकारच्या अर्जांना मान्यता देण्यात येणार आहे.
अर्ज करताना उमेदवारांनी वैयक्तिक माहिती, पुरस्काराचा प्रवर्ग, अलीकडील छायाचित्र तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे. याशिवाय, आपल्या उल्लेखनीय कामगिरीचे स्वरूप आणि त्याचा समाजावर झालेला प्रभाव याबाबतची माहिती 1,000 शब्दांपर्यंत सादर करावी लागणार आहे.
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांतर्गत शौर्य, क्रीडा, समाजसेवा, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण तसेच कला व संस्कृती या सहा क्षेत्रांतील असाधारण कामगिरीचा गौरव केला जातो. शौर्य प्रवर्गात इतरांचे प्राण वाचविण्यासाठी धैर्य दाखविणाऱ्या बालकांचा सन्मान केला जातो. क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या खेळाडूंना गौरविण्यात येते.
समाजसेवा प्रवर्गात समाजकल्याण, पर्यावरण संवर्धन आणि गरजूंना मदत करणाऱ्या बालकांची निवड केली जाते. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन, नवोपक्रम आणि वैज्ञानिक नमुने विकसित करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार दिला जातो. पर्यावरण प्रवर्गात शाश्वत विकास आणि पर्यावरण जनजागृतीसाठी योगदान देणाऱ्या बालकांचा गौरव केला जातो. तसेच कला व संस्कृती प्रवर्गात संगीत, नृत्य, लेखन, चित्रकला, अभिनय आणि इतर कलाक्षेत्रांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या बालकांचा सन्मान करण्यात येतो.
देशातील प्रतिभावान आणि प्रेरणादायी बालकांचा शोध घेऊन त्यांच्या नावांची शिफारस करण्याचे आवाहन मंत्रालयाने शाळा, शैक्षणिक संस्था, पालक, मार्गदर्शक आणि नागरिकांना केले आहे. प्रत्येक गुणी आणि कर्तृत्ववान बालकाला राष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळावी, यासाठी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहनही मंत्रालयाने केले आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
