न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, जामनेर येथे सायबर अवेअरनेस कार्यक्रम यशस्वी. विद्यार्थ्यांना Quick Heal Foundation च्या सायबर सुरक्षा मार्गदर्शक पुस्तिकांचे वितरण.
डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत असताना सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही चिंताजनक वेगाने वाढत आहे. विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा वापर करताना सतर्कता बाळगून सुरक्षित डिजिटल सवयी अंगीकाराव्यात, या उद्देशाने न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, जामनेर येथे विशेष सायबर अवेअरनेस कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे महत्त्व, ऑनलाइन फसवणुकीचे विविध प्रकार आणि सुरक्षित डिजिटल जीवनासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र सायबर जनजागृती अभियानांतर्गत सायबर वॉरियर्स विद्या विशाल सोनवणे आणि साक्षी तानाजी पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या स्वरूपाची माहिती दिली. फिशिंग लिंक, बनावट वेबसाइट्स, सोशल मीडिया फसवणूक, फोटो मॉर्फिंग, ओटीपी फसवणूक, सायबर बुलिंग, डेटा चोरी तसेच ऑनलाइन गेमिंगशी संबंधित धोके याबाबत प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन करण्यात आले.
इंटरनेटवर कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहणे, वैयक्तिक माहितीची गोपनीयता राखणे आणि सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करणे किती आवश्यक आहे, यावर विशेष भर देण्यात आला. तसेच मजबूत पासवर्ड तयार करणे, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करणे, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, सोशल मीडिया गोपनीयता सेटिंग्ज योग्य प्रकारे वापरणे आणि ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारले. सायबर वॉरियर्सनी त्यांच्या शंकांचे समाधान करून सुरक्षित डिजिटल नागरिक बनण्याचा संदेश दिला.
विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत दीर्घकालीन जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने Quick Heal Foundation तर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सायबर सुरक्षा मार्गदर्शक पुस्तिकांचे (Guideline Books) वितरण करण्यात आले. या पुस्तिकांमध्ये सुरक्षित इंटरनेट वापर, सोशल मीडिया सुरक्षा, डिजिटल व्यवहारांमधील खबरदारी तसेच सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी उपयुक्त मार्गदर्शन देण्यात आले आहे.
शाळेचे प्राचार्य एस. एस. पाटील यांनी या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थ्यांना मिळालेली माहिती त्यांच्या दैनंदिन जीवनात अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः सायबर सुरक्षित राहून आपल्या कुटुंबीयांनाही डिजिटल सुरक्षेबाबत जागरूक करण्याचे आवाहन केले.
आर. बी. आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण झाली. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी सुरक्षित डिजिटल समाज निर्मितीसाठी सायबर सुरक्षिततेचे नियम पाळण्याची सामूहिक शपथ घेतली.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
