पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२५ अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ मुक्ताईनगर तालुक्यातील सीएससी (CSC) केंद्र चालकांनी सोमवार (दि. २३) पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून चालकांनी आपल्यावर दाखल केलेले गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, अशी मुख्य मागणी केली आहे.
या संदर्भात सीएससी केंद्र चालकांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले असून, तहसीलदार अनुपस्थित असल्याने नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांनी ते स्वीकारले.
मिळालेल्या माहितीनुसार, फळपीक विमा योजनेअंतर्गत आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली जिल्ह्यात सुमारे ४८ केंद्र चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी पाच चालक मुक्ताईनगर तालुक्यातील आहेत.
निवेदनात चालकांनी स्पष्ट केले आहे की, सीएससी केंद्र चालक हे केवळ डेटा ऑपरेटर म्हणून काम करतात. शेतकऱ्यांनी दिलेल्या कागदपत्रांच्या आधारेच विमा अर्ज भरले जातात. यात सातबारा उतारा, ८अ उतारा, बँक पासबुक आदी कागदपत्रांचा समावेश असतो. अर्जावरील स्वाक्षरी किंवा अंगठा हे संबंधित शेतकऱ्यांचेच असतात.
तसेच, ओटीपी व फार्मर आयडीची सुरक्षा शेतकऱ्यांकडेच असते. शेतकऱ्यांनी स्वतः ओटीपी दिल्यानंतरच विमा अर्ज प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यामुळे अर्जातील माहितीबाबत केंद्र चालकांना जबाबदार धरू नये, असे त्यांनी नमूद केले आहे.
प्रत्यक्ष पिक पाहणी करणे ही जबाबदारी प्रशासन व विमा कंपन्यांची असून, त्यांच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या त्रुटींचे खापर केंद्र चालकांवर फोडले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
याशिवाय, कोणत्याही चालकावर गुन्हा दाखल करण्यापूर्वी सखोल चौकशी करून त्यांची बाजू ऐकून घेणे आवश्यक आहे. चौकशी समिती नेमून योग्य तपास केल्यानंतरच पुढील कारवाई करावी, अन्यथा थेट एफआयआर दाखल करणे नैसर्गिक न्यायाच्या विरोधात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून निष्पाप केंद्र चालकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर कल्पेश पाटील, राजू कोळी, किरण पाटील, मुकेश जावरे, किरण तायडे, दत्तात्रय गोणे, संदीप सपकाळे, शिवदास पाटील, सागर चव्हाण, शामराव कोळी, पंकज नारखेडे, भूषण राऊत, आकाश पुनासे, गौरव लवांडे, हरी पाटील, विनोद कोळी, निलेश गलवाडे, अजय पाटील, गौरव काळे, तुषार सांगळकर आदी केंद्र चालकांच्या सह्या आहेत.
#csc_protest #sthaniksamachar

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
