लोणार तालुक्यात उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांची संयुक्त धाड; ६ टिप्पर आणि रेती मिळून १ कोटी ९२ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने धडक कारवाई केली असून, खापरखेड लाड शिवारात विनापरवाना रेती वाहतूक करणारे तब्बल सहा अवजड टिप्पर जप्त करण्यात आले आहेत. या सहा वाहनांसह त्यामधील रेतीची एकूण किंमत तब्बल १ कोटी ९२ लाख १६ हजार रुपये असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध रेती वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, संबंधित वाहनमालक, चालक तसेच रेती ठेकेदार डॉ. केशव अवचार यांच्याविरुद्ध बीबी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.४५ वाजता लोणारचे उपविभागीय अधिकारी सानप, तहसीलदार पाटील, नायब तहसीलदार इप्पर, मंडळ अधिकारी सानप, ग्राम महसूल अधिकारी निलेश भुजंगराव जाधव तसेच महसूल सेवकांचे पथक सरकारी वाहनाने खापरखेड लाड येथील हराज झालेल्या रेती घाटावरील स्टॉकची पाहणी करण्यासाठी गेले होते. पाहणीदरम्यान सकाळी सुमारे ११.५५ वाजता खापरखेड लाड शिवारात रेती घाटाच्या परिसरातून विनापरवाना व चोरून रेतीची वाहतूक करणारे सहा टिप्पर प्रशासनाच्या पथकाच्या निदर्शनास आले. महसूल पथकाने तातडीने कारवाई करत पंचांसमक्ष संबंधित वाहनांची तपासणी करून ती जप्त केली.
कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये MH 28 BB 2130 या टिप्परमध्ये सहा ब्रास रेती आढळून आली. या रेतीची किंमत सुमारे ३६ हजार रुपये असून वाहनाची किंमत अंदाजे १५ लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या वाहनाचा मालक दिलीप वायाळ असून चालक सोनु सुभाष आडे असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे MH 28 BB 6042 या वाहनामध्ये सहा ब्रास रेती आढळली असून रेतीची किंमत ३६ हजार रुपये आणि वाहनाची किंमत अंदाजे ३५ लाख रुपये आहे. या वाहनाचा मालक रवि बाबुराव जाधव असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय MH 28 BA 6042 या दुसऱ्या टिप्परमध्येही सहा ब्रास रेती आढळून आली असून, रेतीची किंमत ३६ हजार रुपये आणि वाहनाची अंदाजे किंमत ३५ लाख रुपये असल्याचे प्रशासनाच्या कारवाईतील तपशीलात नमूद आहे. या वाहनाचाही मालक रवि बाबुराव जाधव असल्याचे सांगण्यात आले आहे. MH 28 BX 7090 या टिप्परमध्ये सहा ब्रास रेती आढळली असून, रेतीची किंमत ३६ हजार रुपये आणि वाहनाची अंदाजे किंमत ३५ लाख रुपये आहे. या वाहनाचा मालक इम्रान शेख असल्याची माहिती आहे.
MH 28 CF 0179 या टिप्परमध्येही सहा ब्रास रेती आढळून आली. सदर रेतीची किंमत ३६ हजार रुपये असून वाहनाची अंदाजे किंमत ३५ लाख रुपये आहे. या वाहनाचा मालक अरुण लाड असल्याचे प्रशासनाच्या तपशीलात नमूद आहे. तर MH 28 BB 9925 या टिप्परमध्ये सहा ब्रास रेती आढळली असून, रेतीची किंमत ३६ हजार रुपये आणि वाहनाची अंदाजे किंमत ३५ लाख रुपये आहे. या वाहनाचा मालक डॉ. केशव अवचार असून चालक पंकज भुजंग भालेराव असल्याची माहिती देण्यात आली आहे.
प्रशासनाने केलेल्या तपासणीत संबंधित वाहनांच्या चालकांकडे किंवा मालकांकडे रेती वाहतुकीसाठी आवश्यक असलेली वैध रॉयल्टी अथवा परवानगीची कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे आढळून आल्याचे सांगण्यात आले आहे. महसूल पथकाने वाहनांमध्ये असलेल्या रेतीबाबत चौकशी केली असता, ही रेती ‘देवी जुळजाइ प्रा. लिमिटेड’चे मालक डॉ. केशव अवचार यांच्या स्टॉकमधून भरून आणल्याची माहिती समोर आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी निलेश भुजंगराव जाधव यांच्या फिर्यादीवरून बीबी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम ३०३(२) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम ४८(७) आणि ४८(८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल रेणुका दामोदर पदघन करीत असल्याचे सांगण्यात आले आहे.
महसूल प्रशासनाच्या या कारवाईत सहा टिप्पर आणि त्यामधील गौण खनिज मिळून एकूण १ कोटी ९२ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने लोणार तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, कारवाईत रेती वाहतुकीसाठी आवश्यक कागदपत्रांचा अभाव आढळल्याचा प्रशासनाचा दावा असून, संबंधित वाहनमालक, चालक आणि ठेकेदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे लोणार तालुक्यातील अवैध रेती उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पुढील तपासात या प्रकरणातील रेतीचा स्रोत, वाहतुकीची परवानगी, संबंधित स्टॉकची नोंद आणि अन्य कायदेशीर बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
