गणेश विसर्जनामुळे जळगाव शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतुकीचे नियोजन. पर्यायी मार्ग, अवजड वाहनांसाठी निर्बंध आणि रेल्वे गेट क्रमांक १४८ बंदबाबत महत्त्वाची माहिती.
जळगाव : श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव शहर वाहतूक शाखेने वाहतुकीच्या मार्गांमध्ये तात्पुरते बदल केले आहेत. हे बदल २५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपासून २६ सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. नागरिकांनी या कालावधीत प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील सार्वजनिक, खासगी तसेच घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुका सेशन कोर्ट चौक, गोविंदा रिक्षा स्टॉप, नेहरू पुतळा, गोलाणी मार्केट, नटवर टॉकीज, टॉवर चौक, प्रकाश मेडिकल, घाणेकर चौक, लालशॉ बाबा दर्गा, भिलपुरा चौकी, बालाजी मंदिर, बागवान मोहल्ला, जोशी पेठ, सुभाष चौक, बेंडाळे चौक, पांडे डेअरी चौक, पंचमुखी हनुमान मंदिर, सिद्धी कॉलनी, इच्छादेवी चौक, तांबापुरा आणि जुना शिरसोली नाका मार्गे मेहरूण तलावाकडे जाणार आहेत.
या मार्गांवर विसर्जन मिरवणुकांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक होण्याची शक्यता असल्याने विविध दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
पाचोरा मार्गावरील वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था
एस.टी. बसेस व अवजड वाहने :
जळगावहून पाचोराकडे जाणाऱ्या एस.टी. बसेस तसेच अवजड वाहनांनी इच्छादेवी चौकी, डी-मार्ट, मोहाडी रोड, वाय-पॉइंट, गायत्री नगर, गणेश घाट, सेंट टेरेसा स्कूल, हॉटेल ग्रेप्स, मलंगशहा बाबा दर्गा आणि शिरसोली रोड या मार्गाचा वापर करावा. विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही मार्गांवर अवजड वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे.
कार व मोटारसायकली :
जळगावहून पाचोराकडे जाणाऱ्या कार व मोटारसायकलींसाठी आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, महाबळ चौक, संत गाडगेबाबा चौक, राजे संभाजी चौक (मोहाडी रोड), गुरू पेट्रोलपंप (जी-मॉल), मलंगशहा बाबा दर्गा मार्गे पाचोराकडे जाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
पाचोराकडून जळगावकडे येणाऱ्या वाहनांनी याच मार्गाचा उलट दिशेने वापर करावा.
आसोदा-भादलीकडून येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग
आसोदा-भादलीकडून येणाऱ्या वाहनांनी मोहन टॉकीज, गजानन मालुसरे नगर, जुने जळगाव, लक्ष्मी नगर, कालिंका माता मंदिर मार्गे महामार्गावरून अजिंठा चौक, आकाशवाणी चौक आणि नवीन बसस्थानक या मार्गाचा वापर करावा.
पाचोराकडून येणाऱ्या जड वाहनांसाठी वावडदा-मेरी-अजिंठा चौक मार्गे जळगाव तसेच वावडदा-एरंडोल मार्गे जळगाव असे पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
यावल-चोपडा मार्गावरील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
यावल-चोपडाकडून जळगावकडे येणाऱ्या तसेच जाणाऱ्या वाहनांनी आकाशवाणी चौक, शिवकॉलनी, खोटे नगर, तालुका पोलीस स्टेशन, जुना निमखेडी रोड, दूध फेडरेशन रेल्वे गेट, गेंदालाल मिल, शिवाजीनगर, दाळफळ आणि स्मशानभूमी या मार्गाचा वापर करावा.
कानळदा-भोकरकडील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
कानळदा-भोकरकडून ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी स्वातंत्र्य चौक, बहिणाबाई उद्यान, रिंगरोड, गोकुळ स्वीट मार्ट, सुरेश कलेक्शन आणि उड्डाणपूल या मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रेल्वे गेट क्रमांक १४८ वाहतुकीसाठी बंद
दरम्यान, जळगाव-उधना रेल्वे मार्गावरील रेल्वे गेट क्रमांक १४८ येथे जळगाव यार्डमध्ये नॉन-इंटरलॉकिंगचे काम सुरू असल्याने हे गेट २३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून २४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने याबाबत जळगाव शहर वाहतूक शाखेला कळविले आहे.
या कालावधीत दूध फेडरेशनकडून ये-जा करणाऱ्या एस.टी. बसेस, अवजड वाहने, कार आणि मोटारसायकलींनी शिवाजीनगर रेल्वे पुलाचा वापर करावा. कानळदा रोडकडून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांनी सुरेश कलेक्शनजवळील रेल्वे पुलाचा वापर करावा.
केवळ हलकी व लहान वाहने तसेच मोटारसायकलींसाठी बजरंग रेल्वे बोगद्याचा वापर करता येणार आहे.
वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये आणि नागरिकांना अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी वाहतूक शाखेने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा. नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जळगाव शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
