जिल्हा परिषद लातूर कार्यालयात कर्मचाऱ्यांना सायबर सुरक्षेचे धडे
लाईव्ह हॅकिंग डेमो, डीपफेक व व्हॉइस क्लोनिंगद्वारे सायबर धोक्यांची जाणीव
लातूर : क्विक हील फाऊंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद, लातूर कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्यांना ऑनलाइन जगातील वाढते धोके, सायबर फसवणुकीचे प्रकार आणि डिजिटल सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात तुषार वाघमारे आणि आदित्य माने यांनी लाईव्ह हॅकिंगचे डेमो सादर करून उपस्थितांना सायबर धोक्यांची जाणीव करून दिली. हॅकिंगच्या घटनांमुळे कोणते नुकसान होऊ शकते आणि अशा घटनांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. तसेच डीपफेकिंग आणि व्हॉइस क्लोनिंग यांसारख्या आधुनिक सायबर धोक्यांची माहिती देत त्यापासून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न मांडले. क्विक हील फाऊंडेशनच्या टीमने प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांच्या शंकांचे निरसन केले. यासोबतच घरातील मुलांचा डिजिटल वापर सुरक्षित ठेवण्यासाठी डिजिटल पेरेंटिंग कसे करावे, मुलांना ऑनलाइन धोक्यांपासून कसे सावध करावे आणि पालकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला सायबर पोलीस विभागातील दोन अधिकारी उपस्थित होते. त्यांनीही सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रमात सहभागी होत उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी क्विक हील फाऊंडेशनच्या टीममधील तुषार वाघमारे, यश मेंडीकर, हर्ष कारंडे, साहिल जाधव आणि परमेश्वर पांढरे उपस्थित होते. कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सायबर सुरक्षेबाबत संवाद साधला.
डिजिटल जगात सुरक्षित आणि जबाबदार वर्तनासाठी सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रमांची गरज वाढत आहे, हे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
