कॉस्मॉस मोकन इंग्लिश क्लासेसमध्ये लाईव्ह हॅकिंगद्वारे सायबर सुरक्षा जनजागृती
डीपफेक, व्हॉइस क्लोनिंग आणि फोटो मॉर्फिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सायबर धोक्यांची जाणीव
लातूर : लातूरमधील इंग्लिश शिकवणी संस्था कॉस्मॉस मोकन इंग्लिश क्लासेस येथे क्विक हील फाऊंडेशनच्या वतीने सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी तुषार वाघमारे यांनी लाईव्ह हॅकिंगचे डेमो सादर करून विद्यार्थ्यांना सायबर धोक्यांची जाणीव करून दिली.
कार्यक्रमात आदित्य माने यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या सायबर सुरक्षा आणि डिजिटल वापराबाबतच्या शंका जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देत त्यांच्या डिजिटल सुरक्षेशी संबंधित समस्यांचे निरसन करण्यात आले.
यावेळी डीपफेकिंग, व्हॉइस क्लोनिंग आणि फोटो मॉर्फिंग यांसारख्या तंत्रज्ञानाचा गैरवापर कशा प्रकारे होऊ शकतो, याबाबत प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. डिजिटल जगात वैयक्तिक माहिती, फोटो आणि आवाजाचा सुरक्षित वापर कसा करावा, तसेच संशयास्पद डिजिटल व्यवहारांपासून कसे सावध राहावे, याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
हा कार्यक्रम अजय मस्के सर यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी अत्यंत महत्त्वाच्या आणि गरजेच्या विषयावर सायबर सुरक्षा जनजागृतीचे कार्य सुरू ठेवले असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी टीमला सकारात्मक अभिप्राय दिला.
यावेळी क्विक हील फाऊंडेशनच्या टीममधील आदित्य माने, साहिल जाधव, परमेश्वर पांढरे, हर्ष करंडे, यश मेंडेकर, कार्तिक मोतीपोळे आणि ओम भालचंद्र जाधव उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सायबर सुरक्षेबाबत संवाद साधला.
डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा सुरक्षित आणि जबाबदार वापर करण्यासाठी सायबर सुरक्षेची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
