‘उद्याची डिजिटल पिढी त्यांच्या हातात; म्हणून आजची जागरूकता गरजेची!’ ज्ञानप्रकाश बाल विकास केंद्रात सायबर जनजागृती अभियान

लातूर येथील ज्ञानप्रकाश बाल विकास केंद्रात विद्यार्थ्यांना ओटीपी, बनावट लिंक, क्यूआर कोड, सोशल मीडिया आणि ऑनलाइन फसवणुकीपासून बचावाबाबत मार्गदर्शन करताना सायबर वॉरियर्स.

क्विक हील फाउंडेशनच्या सहकार्याने ज्ञानप्रकाश बाल विकास केंद्रात विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे आणि डिजिटल सुरक्षेबाबत सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले.

डिजिटल युगात लहान वयापासूनच सायबर सुरक्षेबाबत जाणीव निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा सुरक्षित व जबाबदारीने वापर करावा, या उद्देशाने क्विक हील फाउंडेशनच्या सहकार्याने ज्ञानप्रकाश बाल विकास केंद्रात सायबर जनजागृती अभियान राबविण्यात आले.

या उपक्रमाचे आयोजन सायबर वॉरियर्स नेहल बुलानी, नम्रता तौर, साहिल जाधव आणि कृष्णा पांढरे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक आणि डिजिटल सुरक्षेबाबत सोप्या तसेच मनोरंजक पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले.

या सत्रात विद्यार्थ्यांना ओटीपी कोणालाही सांगू नये, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, क्यूआर कोड स्कॅन करताना काळजी घ्यावी आणि मजबूत पासवर्डचा वापर करावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर न करणे, बनावट गेम्स व आकर्षक ऑफर्सपासून सावध राहणे आणि अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन संवाद साधताना आवश्यक सतर्कता बाळगणे याबाबतही माहिती देण्यात आली.

डिजिटल साधनांचा वापर वाढत असताना विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेच्या मूलभूत नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. लहान वयातच योग्य डिजिटल सवयी निर्माण झाल्यास भविष्यात ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यास विद्यार्थ्यांना मदत होऊ शकते, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

विद्यार्थ्यांनीही सायबर सुरक्षेबाबत विविध प्रश्न विचारत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. “उद्याची डिजिटल पिढी त्यांच्या हातात; म्हणून आजची जागरूकता गरजेची!” या संदेशातून सुरक्षित आणि जबाबदार डिजिटल वापराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!