‘उद्याची डिजिटल पिढी त्यांच्या हातात; म्हणून आजची जागरूकता गरजेची!’ Podar International School मध्ये सायबर जनजागृती अभियान

लातूर येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना ओटीपी, बनावट लिंक, क्यूआर कोड, सोशल मीडिया आणि ऑनलाइन फसवणुकीपासून बचावाबाबत मार्गदर्शन करताना सायबर वॉरियर्स.

क्विक हील फाउंडेशनच्या सहकार्याने पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे आणि डिजिटल सुरक्षेबाबत सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले.

 डिजिटल युगात लहान वयापासूनच विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यांनी तंत्रज्ञानाचा सुरक्षित व जबाबदारीने वापर करावा, या उद्देशाने क्विक हील फाउंडेशनच्या सहकार्याने पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सायबर जनजागृती अभियान राबविण्यात आले.

या उपक्रमाचे आयोजन सायबर वॉरियर्स नेहल बुलानी, नम्रता तौर, साहिल जाधव आणि कृष्णा पांढरे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक आणि डिजिटल सुरक्षेबाबत सोप्या व मनोरंजक पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले.

या सत्रात ओटीपी कोणालाही सांगू नये, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, क्यूआर कोड स्कॅन करताना काळजी घ्यावी आणि मजबूत पासवर्डचा वापर करावा, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर न करणे, बनावट गेम्स आणि आकर्षक ऑनलाइन ऑफर्सपासून सावध राहणे तसेच अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन संवाद साधताना सतर्कता बाळगणे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

डिजिटल साधनांचा वापर विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने, त्यांना सायबर सुरक्षेच्या मूलभूत नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. डिजिटल जगात कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची सुरक्षितता तपासणे आणि संशयास्पद ऑनलाइन व्यवहारांपासून दूर राहणे गरजेचे आहे, असा संदेश या अभियानातून देण्यात आला.

विद्यार्थ्यांनीही सायबर सुरक्षेबाबत विविध प्रश्न विचारत उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. “उद्याची डिजिटल पिढी त्यांच्या हातात; म्हणून आजची जागरूकता गरजेची!” या संदेशातून सुरक्षित आणि जबाबदार डिजिटल वापराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!