महाराष्ट्र विद्यालयात शिक्षकांसाठी सायबर जनजागृती

“माझा डेटा, माझी जबाबदारी” या संदेशातून महाराष्ट्र विद्यालयातील शिक्षकांना ओटीपी, पासवर्ड, बँकिंग आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विद्यालयात शिक्षकांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमादरम्यान शिक्षकांना ऑनलाइन फसवणुकीचे विविध प्रकार, ओटीपी फसवणूक, फिशिंग लिंक, बनावट फोन कॉल, सोशल मीडिया फसवणूक तसेच डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

डिजिटल व्यवहार करताना ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची माहिती तसेच वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन करण्यात आले. तसेच कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करण्यापूर्वी तिची खात्री करावी आणि अनोळखी फोन कॉल, संदेश किंवा संशयास्पद ऑफरपासून सावध राहावे, याबाबत शिक्षकांना माहिती देण्यात आली.

या उपक्रमात सायबर वॉरियर्स अविष्कार कांबळे आणि नरेश पंडित यांनी शिक्षकांशी संवाद साधत सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.

“माझा डेटा, माझी जबाबदारी; सुरक्षित डिजिटल व्यवहार हीच काळाची गरज,” असा संदेश यावेळी देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!