भातांगळी गावात सायबर जनजागृती; सायबर वॉरियर्सकडून नागरिकांना डिजिटल सुरक्षेचे धडे

भातांगळी गावात आयोजित सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमात नागरिकांना ओटीपी, यूपीआय फ्रॉड, फिशिंग, बनावट लिंक आणि इतर ऑनलाइन फसवणुकीपासून बचावाबाबत मार्गदर्शन करताना सायबर वॉरियर्स.

क्विक हिल फाउंडेशन आणि राजर्षी शाहू महाविद्यालय लातूरच्या उपक्रमातून भातांगळी गावात सायबर सुरक्षा व सुरक्षित डिजिटल व्यवहाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती.

 क्विक हिल फाउंडेशन आणि राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या सायबर जनजागृती उपक्रमांतर्गत भातांगळी गावात नागरिकांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमादरम्यान सायबर वॉरियर्स श्रेयस माकणे, आयुष जोशी, अविष्कार कांबळे, अथर्व नालापुरे आणि नरेश पंडित यांनी नागरिकांशी संवाद साधत सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी ओटीपी फसवणूक, यूपीआय फ्रॉड, फिशिंग, बनावट लिंक, बनावट नोकरीच्या जाहिराती, बनावट ट्रेडिंग ॲप, एपीके फाईल्स तसेच सोशल मीडिया फसवणूक यांसारख्या सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली.

अनोळखी व्यक्तीने फोन, मेसेज किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधल्यास कोणत्याही परिस्थितीत ओटीपी, पासवर्ड, यूपीआय पिन, बँक खात्याची माहिती किंवा इतर गोपनीय माहिती शेअर करू नये, असे आवाहन करण्यात आले. तसेच कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करण्यापूर्वी तिची सत्यता तपासावी आणि अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या एपीके फाईल्स मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू नयेत, असा सल्लाही देण्यात आला.

सायबर फसवणुकीपासून बचावासाठी नागरिकांनी डिजिटल व्यवहार करताना सतर्कता बाळगणे आवश्यक असून, “सावध रहा, सुरक्षित रहा आणि सायबर फसवणुकीपासून स्वतःचे तसेच आपल्या कुटुंबाचे संरक्षण करा,” असा संदेश सायबर वॉरियर्सनी यावेळी दिला.

या जनजागृती उपक्रमामुळे भातांगळी गावातील नागरिकांमध्ये सायबर सुरक्षा, डिजिटल गोपनीयता आणि सुरक्षित ऑनलाइन व्यवहारांबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!