आरटीओ कार्यालयाच्या वेळेत बदल; जिल्ह्यात उष्णतेचा कहर 

उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन जळगाव आरटीओ कार्यालयाने लायसन्स चाचणी व योग्यता प्रमाणपत्रासाठी सकाळी ८ ते दुपारी २ अशी नवी वेळ जाहीर केली.

जळगावमध्ये तापमानवाढीचा परिणाम; आरटीओ कार्यालयाने लायसन्स व फिटनेस कामांसाठी नव्या वेळापत्रकाची घोषणा केली.

 जळगाव जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण तसेच कच्ची व पक्की अनुज्ञप्ती (लायसन्स) चाचणीसाठीच्या अपॉइंटमेंट वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला असून आता ही कामे सकाळी ८ ते दुपारी २ वाजेदरम्यान करण्यात येणार आहेत.

सध्या जिल्ह्यात तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला असून तीव्र उष्णतेची लाट जाणवत आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत आरटीओ कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या वाहनमालक, चालक आणि अनुज्ञप्तीधारकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयात दररोज योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, कच्ची व पक्की अनुज्ञप्ती चाचणी यांसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असते. या प्रक्रिया मैदानी स्वरूपाच्या असल्याने नागरिकांना प्रखर उन्हाचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन कार्यालयीन वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.

राजेंद्र वर्मा यांनी सांगितले की, बदललेल्या वेळेनुसार आता सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंतच अपॉइंटमेंट दिल्या जाणार आहेत. नागरिकांनी नवीन वेळेची नोंद घेऊन त्यानुसार कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास होऊ नये आणि सकाळच्या वेळेतच कामे पूर्ण करता यावीत, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!