जळगावसह खानदेशातील प्रवाशांसाठी मोठी बातमी; काकीनाडा–हिसार एक्स्प्रेसला नियमित दर्जा मिळाल्याने धार्मिक पर्यटनाला चालना.
राजस्थानमधील प्रसिद्ध धार्मिक स्थळे श्री खाटू श्याम मंदिर आणि अजमेर शरीफ दर्गा येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काकीनाडा टाऊन–हिसार विशेष एक्स्प्रेसला आता कायमस्वरूपी नियमित गाडीचा दर्जा देण्यात आला असून, यामुळे खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यापूर्वी भुसावळ, जळगाव, धरणगाव आणि अमळनेर परिसरातील प्रवाशांना या धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी खाजगी वाहतुकीचा खर्चिक पर्याय निवडावा लागत होता किंवा अनेक गाड्या बदलत प्रवास करावा लागत होता. त्यामुळे प्रवास वेळखाऊ व त्रासदायक ठरत होता. मात्र आता थेट रेल्वे सेवा उपलब्ध झाल्याने हा प्रवास अधिक सोपा, जलद आणि परवडणारा होणार आहे.
सध्या ०७७१७/०७७१८ क्रमांकाने धावणारी काकीनाडा टाऊन–हिसार विशेष साप्ताहिक गाडी आता नियमित एक्स्प्रेस सेवेत रूपांतरित करण्यात आली आहे. नव्या व्यवस्थेनुसार गाडी क्रमांक १७२९५ काकीनाडा टाऊन–हिसार एक्स्प्रेस १२ मेपासून सुरू होणार असून, १७२९६ हिसार–काकीनाडा टाऊन एक्स्प्रेस १५ मेपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.
वेळापत्रकानुसार, १७२९५ ही गाडी दर मंगळवारी काकीनाडा टाऊन येथून सकाळी ५.४० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी १०:२० वाजता हिसार येथे पोहोचेल. तर १७२९६ ही गाडी दर शुक्रवारी हिसार येथून दुपारी २:१० वाजता रवाना होऊन तिसऱ्या दिवशी रात्री ९:३५ वाजता काकीनाडा टाऊन येथे पोहोचेल.
या दोन्ही गाड्यांना भुसावळ, जळगाव, धरणगाव आणि अमळनेर या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खानदेशातील प्रवाशांना याचा थेट लाभ मिळणार आहे.
रेल्वेच्या या निर्णयामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असून, भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि किफायतशीर होणार असल्याचे मत प्रवाशांकडून व्यक्त केले जात आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
