कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात २०० क्षमतेचे नवीन वसतिगृह उभारणार

जळगावातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी २३ कोटी खर्चातून नवीन आधुनिक वसतिगृह उभारण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषद बैठकीत घेण्यात आला.

ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय; उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नवीन वसतिगृहासाठी २३ कोटींचा प्रकल्प मंजूर.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थ्यांची वाढती प्रवेशसंख्या आणि निवास व्यवस्थेची गरज लक्षात घेऊन २०० विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय 26 मे 2026 रोजी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.

या वसतिगृहाच्या बांधकामासाठी सुमारे 23 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सध्या असलेल्या तीन वसतिगृहांमधून जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची निवासाची गरज पूर्ण होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला.

विद्यापीठ निधीसोबतच जनसहभागातूनही अर्थसहाय्य उभे करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यामध्ये व्यवस्थापन परिषद सदस्य नंदकुमार बेंडाळे, नितीन झाल्टे आणि ॲड. अमोल पाटील यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे. तसेच किमान 25 हजार रुपयांची देणगी देण्याबाबत सदस्यांनी सहमती दर्शवली.

विविध सुविधा व बांधकामासाठी देणगी रचना निश्चित करण्यात आली असून, अद्ययावत स्वयंपाकघर व भोजनगृहासाठी 1 कोटी, प्रत्येक निवासी मजल्यासाठी 1 कोटी, संशोधन व संगणक प्रयोगशाळेसाठी 50 लाख, 24 तास ग्रंथालय व अभ्यासिकेसाठी 50 लाख, सामायिक विश्रामकक्ष व जिमखान्यासाठी 25 लाख, तर एका निवास खोलीसाठी 5 लाख रुपयांची देणगी ठरवण्यात आली आहे.

1 लाख रुपयांपेक्षा अधिक देणगी देणाऱ्यांसाठी ‘वॉल ऑफ ऑनर्स’ तयार करण्यात येणार असून दानशूर व्यक्तींची नावे संबंधित ठिकाणी प्रदर्शित केली जाणार आहेत. तसेच देणगीदारांना आयकर कलम 80G अंतर्गत सवलत मिळणार आहे.

उद्योजकांनी सीएसआर निधीतून तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी या उपक्रमासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!