जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; दोन मुख्य ड्रग्ज पेडलर परराज्यात पळाल्याचा संशय 

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर एलसीबीची धडक कारवाई. ६ लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून दोन मुख्य पुरवठादारांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

जळगाव शहरातील ड्रग्ज नेटवर्कविरोधात पोलिसांची मोठी कारवाई. ६ लाखांचे ड्रग्ज जप्त; मुख्य पुरवठादारांच्या अटकेसाठी विशेष पथके रवाना.

जळगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात कारमधून ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) पर्दाफाश केल्यानंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत ड्रग्ज पुरवठा साखळीचा उलगडा झाला असून दोन मुख्य पुरवठादार अद्याप फरार आहेत. ते परराज्यात पळून गेल्याचा पोलिसांना संशय असून त्यांचा शोध सुरू आहे.

एलसीबीच्या पथकाने बाजार समिती परिसरात उभ्या असलेल्या संशयास्पद कारवर छापा टाकून ड्रग्ज विक्रीचा प्रकार उघडकीस आणला होता. या कारवाईत रईस देशमुख, तौसिफ सैय्यद आरिफ आणि कृणाल उर्फ लकी पाटील यांना अटक करून सुमारे ६ लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.

चौकशीत या प्रकरणातील ड्रग्ज पुरवठा साखळीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रईस देशमुख याने अमदज उर्फ बिल्डर शेख (फातेमा नगर), तौसिफ आरिफ याने इम्रान उर्फ इम्मा हसन हुसेन भिस्ती (शाहूनगर) आणि कृणाल उर्फ लकी पाटील याने अन्वर पटेल (सुप्रीम कॉलनी) यांच्याकडून ड्रग्ज मिळवून त्याची विक्री करत असल्याची कबुली दिल्याचे तपासात समोर आले आहे.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी बोरनार येथील अन्वर पटेल याला अटक केली असून इतर दोन संशयितांचा शोध सुरू आहे. अमदज उर्फ बिल्डर शेख आणि इम्रान उर्फ इम्मा हे दोघे अद्याप फरार आहेत.

पोलिसांनी या दोघांचा शोध घेण्यासाठी मध्यप्रदेश, सुरत, पुणे आणि मुंबई येथे विशेष पथके रवाना केली आहेत. मात्र अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. हे दोघे राज्याबाहेर पळून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या अटकेसाठी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे.

दरम्यान, या कारवाईमुळे जळगाव शहरातील ड्रग्ज नेटवर्क पुन्हा एकदा चर्चेत आले असून संपूर्ण साखळीचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!