जळगाव कृउबा मार्केट कमिटी अध्यक्षांच्या मुलाविरुद्ध शनिपेठ पोलिसांत तक्रार; गोल्ड लोनच्या नावाखाली १८ लाखांच्या फसवणुक

जळगावातील सराफा व्यावसायिकाकडून गोल्ड लोन सोडवण्याचे आमिष दाखवत १८ लाख १ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप. कृउबा मार्केट कमिटी अध्यक्षांच्या मुलाविरोधात शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल असून पुढील तपास सुरू आहे.

जळगावच्या सराफा बाजारात खळबळ; गोल्ड लोन व्यवहारातून लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप. शनिपेठ पोलिसांकडे तक्रार दाखल.

गोल्ड लोनवर तारण ठेवलेले सोने सोडवून दागिने मोडण्यासाठी देण्याचे आमिष दाखवत एका सराफा व्यावसायिकाकडून तब्बल १८ लाख १ हजार रुपये घेतल्याया प्रकरणी जळगाव कृउबा फळबाजार मार्केट कमिटीचे अध्यक्ष संजय अमृत महाजन यांचा मुलगा ओम संजय महाजन याच्याविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.. या प्रकरणामुळे सराफा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

तक्रारदार कृष्णा भगवान शिंदे (रा. रामचंद्र नगर, जळगाव) हे जोशीपेठ येथील कालभैरव मंदिराजवळ “ओम ज्वेलर्स” या नावाने सराफा व्यवसाय करतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सुमारे महिनाभरापूर्वी त्यांची ओम संजय महाजन याच्याशी ओळख झाली होती.

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, ४ जून रोजी ओम महाजन याने फोनद्वारे संपर्क साधून बजाज फायनान्सकडे तारण ठेवलेल्या १९८ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर सुमारे १९ लाख रुपयांचे गोल्ड लोन असल्याची माहिती दिली. संबंधित दागिने सोडवून ते मोडण्यासाठी देण्याचा प्रस्ताव ठेवत त्याने आर्थिक मदतीची विनंती केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

विश्वास संपादन करण्यासाठी त्याने काही संबंधित व्यक्तींची नावे सांगितली तसेच दागिन्यांचे छायाचित्रे पाठविल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. त्यानंतर ५ जून रोजी तो शिंदे यांच्या दुकानात आला व तातडीने १९ लाख रुपयांची आवश्यकता असल्याचे सांगितले.

तक्रारीनुसार, सोने कारागीर चेतन दुसाने यांच्या माध्यमातून शेजारील एका सराफा व्यावसायिकाकडून १९ लाख रुपयांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. ६ जून रोजी शिंदे, दुसाने आणि ओम महाजन यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत जाऊन ही रक्कम ओम महाजनच्या खात्यात जमा केली.

मात्र त्यानंतर गोल्ड लोन खात्यात रक्कम वर्ग केल्याचे सांगूनही विविध तांत्रिक कारणे, केवायसी प्रक्रिया आणि खातेविषयक अडचणींचा उल्लेख करण्यात आला. कोटक महिंद्रा बँकेत केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तरीही व्यवहार पूर्ण झाला नाही आणि रक्कम परत मिळाली नसल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.

दरम्यान, ८ जून रोजी तक्रारदारांच्या खात्यात ९९ हजार रुपये ऑनलाइन जमा करण्यात आले. उर्वरित रक्कम लवकरच परत करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यानंतर संपर्क कमी झाला आणि फोनला प्रतिसाद मिळणे बंद झाल्याने संशय निर्माण झाल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

याप्रकरणी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधित तरुणाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन माहिती दिली. मात्र समाधानकारक तोडगा न निघाल्याने अखेर शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, या प्रकारात त्यांची १८ लाख १ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी तक्रार प्राप्त करून घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, सराफा बाजारात संबंधित व्यक्तीकडून इतर काही व्यावसायिकांचीही फसवणूक झाल्याची चर्चा असली, तरी याबाबत अधिकृत तक्रार अद्याप दाखल झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिस तपासानंतरच या चर्चांबाबतचे वास्तव स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!